मुलुंड ‘डंपिंग’चे हॅपी एंडिंग कधी? ५ वर्षांत फक्त २४ लाख मेट्रिक टन कचऱ्यावरच प्रक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 09:37 AM2024-02-16T09:37:19+5:302024-02-16T09:41:33+5:30
प्रकल्प खर्च वाढणार.
मुंबई : मुलुंड क्षेपण भूमीची (डंपिंग ग्राऊंड) क्षमता संपुष्टात आल्यामुळे २०१८ मध्ये पालिकेकडून येथील कचऱ्याची विल्हेवाट लावून ही जमीन पुनर्प्राप्त करण्यासाठी प्रकल्प हाती घेण्यात आला. या प्रकल्पाचे काम संथ गतीने सुरू असल्याने गेल्या पाच वर्षांत केवळ २४.४१ लाख मेट्रिक टन जुन्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. जून, २०२५ पर्यंत या डंपिंग ग्राऊंडवरील तब्बल ७० लाख मेट्रिक टन इतक्या जुन्या साचलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येईल, असा दावा मुंबई महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
मुलुंड डंपिंग ग्राऊंडवर १९६७ पासून कचरा टाकला जातो. या डंपिंग ग्राऊंडची क्षमता संपल्यामुळे या ठिकाणी जमलेल्या सुमारे ७० लाख मेट्रिक टन इतक्या कचऱ्यावर योग्य तंत्रज्ञानाद्वारे प्रक्रिया करून या डंपिंग ग्राऊंड जमिनी पुन्हा प्राप्त करण्यासाठी पालिकेकडून प्रकल्प उभारणी करण्यात आली. यासाठी कंत्राटदार नेमण्यात आला आणि २०१८ पासून मुलुंड डंपिंग बंद करण्यात आल्याचा दावा करण्यात आला.
हे डंपिंग ग्राऊंड बंद करून त्या ठिकाणची जमीन पुन्हा मिळविण्यासाठी कचऱ्यावरील या प्रक्रियेसाठी सुमारे ६७० कोटी खर्च करणार आहे. पालिकेच्या कंत्राटानुसार सहा वर्षांत डंपिंग ग्राऊंडमधील कचऱ्यावर प्रक्रिया करून ती जमीन मोकळी केली जाणार होती. मात्र, प्रकल्पाचे काम इतक्या संथगतीने सुरू आहे की आतापर्यंत म्हणजे पाच वर्षांत फक्त २४ लाख मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया होऊ शकली आहे.