७९ शाळांचा १०० टक्के निकाल; पालिकेच्या शाळांतील १४ हजार ७७८ विद्यार्थी उत्तीर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 09:37 AM2024-05-28T09:37:36+5:302024-05-28T09:40:18+5:30
महानगरपालिकेच्या ७९ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला असून, ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविलेले ६३ विद्यार्थी आहेत.
मुंबई : महानगरपालिकेच्या ७९ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला असून, ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविलेले ६३ विद्यार्थी आहेत. मुंबई पालिकेच्या २४८ माध्यमिक शाळांमधून एकूण १६ हजार १४० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १४ हजार ७७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून सरासरी निकाल ९१.५६ टक्के लागला आहे.
कुलाबा महानगरपालिका माध्यमिक शाळेमधील कुमार आयुष रामदास जाधव या विद्यार्थ्याने ९७.४० टक्के गुण मिळविले असून, पालिकेच्या सर्व शाळांमधून पहिला आला आहे. तर द्वितीय क्रमांक खेरवाडी मुंबई पब्लिक स्कूल माध्यमिक शाळेचा कुमार वरुण चौरसिया या विद्यार्थ्याने मिळविला असून, त्याला ९७.२० टक्के गुण प्राप्त झाले आहेत. तिसरा क्रमांक याच शाळेचा कुमार आदित्य वानखेडे या विद्यार्थ्याने मिळविला असून, त्याला ९६ टक्के गुण प्राप्त झाले आहेत.
मुलांच्या प्रगतीची माहिती घेण्यासाठी वेळोवेळी अधिकारी व मुख्याध्यापकांच्या सभा घेण्यात आल्या. ज्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता होती, त्या ठिकाणी तासिका तत्त्वावर शिक्षकांची नेमणूक करण्यात आली. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीमुळे पालिका शाळांच्या निकालात चांगली वाढ दिसून आली आहे. - राजू तडवी, शिक्षणाधिकारी
६३ विद्यार्थ्यांना मिळाले ९० टक्क्यांहून अधिक गुण-
१) गतवर्षी ४२ शाळांचा १०० टक्के निकाल लागला. या वर्षी मार्च २०२४ मध्ये ७९ शाळांचा १०० टक्के निकाल लागला आहे.
२) गतवर्षी ९० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ५३ होती. यंदा त्यामध्ये दहा विद्यार्थ्यांची वाढ होऊन ही संख्या ६३ झाली आहे.