Join us  

सायन पुलावर १ ऑगस्टपासून ‘नो एंट्री’, लवकरच हातोडा; पुनर्बांधणीसाठी जुलै २०२६ पर्यंत बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 9:30 AM

पूर्व-पश्चिम उपनगरातील वाहतुकीवर येणार ताण.

मुंबई : मुंबई पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा आणि वाहतूक व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा सायन येथील मध्य रेल्वे मार्गावरील ११२ वर्षे जुना पूल पाडण्याच्या हालचालींना पुन्हा वेग येण्याची शक्यता आहे. त्याकरिता १ ऑगस्ट २०२४ ते जुलै २०२६ असे दोन वर्षे हा पूल वाहतुकीसाठी बंद असणार आहे. परिणामी पूर्व-पश्चिमेची कनेक्टिव्हिटी पूर्णपणे तुटणार असून, मुंबईची वाहतूक व्यवस्था कोलमडून पडणार आहे. पूर्व-पश्चिम उपनगरात येजा करण्यासाठी वाहनचालक व प्रवाशांना मोठा वळसा पडणार आहे.

सायन पूल ब्रिटिशकालीन असून, तो १९१२ मध्ये बांधण्यात आला आहे. हा पूल वाहतुकीसाठी असुरक्षित असल्याचे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी)ने आपल्या स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टमध्ये जाहीर केले आहे. त्यामुळे हा पूल पाडून नवीन बांधण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून हालचाली सुरू होत्या. मात्र स्थानिकांनी त्याला विरोध केल्यानंतर लोकप्रतिनिधींनी रेल्वे प्रशासनाची भेट घेत दहावी, बारावीच्या परीक्षा आणि इतर गोष्टी ध्यानात घेत पुलाचे काम पुढे ढकलावे, अशी विनंती केली होती. त्यामुळे पुलाचे पाडकाम लांबणीवर टाकले जात होते.

पुलाच्या कामासाठी तारीख पे पारीख-

१) २० जानेवारी २०२४

२) २८ फेब्रुवारी २०२४

३) २८ मार्च २०२४

४) नवीन पूल २४ महिन्यांत बांधून पूर्ण केला जाईल.

५) पाचव्या, सहाव्या रेल्वे मार्गांच्या कामासह अंत्यत जुन्या झालेल्या पुलाच्या जागी नवा पूल बांधला जाणार आहे.

६) मध्य रेल्वे आणि महापालिका एकत्र यासाठी काम करणार आहे.

७) नवीन पूल हा सिंगल स्पॅन सेमी-थ्रू गर्डर्स ४९ मीटर लांबीचा आणि २९ मीटर रुंदीचा आरसीसी स्लॅब पद्धतीचा असेल.

सायन पुलावरून आधीच अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. आता पुलाच्या कामासाठी वाहतूक पूर्ण बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे आता माहीम भागात जाण्यासाठी एक ते दीड किलोमीटर प्रवास वाढणार आहे. त्यामुळे रिक्षा भाडे वाढल्यामुळे प्रवाशांची, तर वाहतूककोंडीमुळे रिक्षाचालकांची गैरसोय होणार आहे. तसेच, वाढत जाणाऱ्या भाड्यामुळे प्रवासी कमी झाल्यामुळे रिक्षा व्यवसाय कमी होण्याची भीती आहे. - ए. के. तिवारी, अध्यक्ष, स्वाभिमानी टॅक्सी-रिक्षा युनियन.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकासायन कोळीवाडा