Join us  

वाहतुकीचे र‘सायन’ बिघडले ! सायन पूल बंद केल्याने एलबीएसवर वाहनांच्या रांगा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2024 9:38 AM

मध्य रेल्वे मार्गावरील सायन येथील ११२ वर्षे जुना रेल्वे पूल पाडून नव्या पुलाचे बांधकाम हाती घेण्यात येत आहे.

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील सायन येथील ११२ वर्षे जुना रेल्वे पूल पाडून नव्या पुलाचे बांधकाम हाती घेण्यात येत आहे. त्यामुळे १ ऑगस्टपासून पूल बंद करण्यात आला असून, पहिल्याच दिवशी गुरुवारी मुंबईची वेश असलेल्या धारावी, सायन तसेच लाल बहादूर शास्त्री (एलबीएस) मार्गावर सकाळी व सायंकाळी वाहनांची मोठी कोंडी झाली होती. पूल बंद केल्याने वाहतूक धारावीतून वळविण्यात आली आहे. मात्र त्यामुळे एलबीएसहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग गाठण्यासाठी अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ लागला. 

मध्य रेल्वे आणि मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सायन रेल्वे पूल नव्याने बांधण्यात येणार आहे. वाहतूक पोलिसांनी हा पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे. रेल्वेच्या हद्दीतील बांधकाम रेल्वे तर महापालिकेच्या हद्दीतील बांधकाम महापालिका करणार आहे. अडीच वर्षांहून अधिक काळ पुलाचे बांधकाम सुरू राहणार असले तरी बांधकामास यापेक्षा अधिक कालावधी लागण्याची शक्यता आहे. 

अडीच वर्षे हा त्रास कायम-

सायन आणि धारावी परिसरात मोठ्या संख्येने शाळा व महाविद्यालये आहेत. यात साधना महाविद्यालय, डीएस हायस्कूल, अवर लेडी, छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयाचा समावेश आहे. सायन पुलामुळे या शाळांतील विद्यार्थ्यांचा प्रवास अवघ्या १० ते १५ मिनिटांत होत असत. मात्र, गुरुवारी पहिल्याच दिवशी वळसा पडल्यामुळे हा प्रवास पूर्ण होण्यास दीड तास लागला. अडीच वर्षे हा त्रास कायम राहणार आहे. -प्रमोद माने, रहिवासी, धारावी 

मुंबई शहरातून सुरू होणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड सायन येथे धारावीच्या दिशेने खाली उतरून ठाण्याकडे जातो. धारावीपासून सुरू होणारा हा रस्ता जुना आग्रा रोड म्हणजे लाल बहादूर शास्त्री मार्ग या नावाने ओळखला जातो. एलबीएसहून सायन दिशेकडे येणारी सगळी वाहतूक आता धारावीकडे म्हणजे धारावी आगाराच्या रस्त्याहून माहीमकडे वळविण्यात आली आहे.

माहीमच्या दिशेने म्हणजे धारावी टी जंक्शनकडे दाखल झाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर दाखल होण्यासाठी माटुंगा लेबर कॅम्पमधून पुढे सरकावे लागते. टी जंक्शन, माटुंगा लेबर कॅम्प असे अंतर पार करत सायन रुग्णालयाच्या दिशेने डॉ.आंबेडकर मार्गावर येता येते. सायनहून एलबीएकडे परतीचा प्रवासही याच दिशेने करावा लागतो.

१) कल्पना सिनेमासमोर रस्त्याच्या मधोमध हाती घेण्यात आलेल्या कामामुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे येथे पहिल्याच दिवशी सकाळी व संध्याकाळी वाहतूक कोंडी झाली होती.

२) धारावी टी जंक्शनवर सर्व दिशांनी एकाच ठिकाणी दाखल होणाऱ्या वाहनांमुळे कोंडीचा सामना करावा लागला. 

३) माटुंगा लेबर कॅम्पमध्ये रस्ता अरुंद आहे. त्यामुळे सायन रुग्णालयाच्या बस थांब्यापर्यंत वाहनांची गर्दी झाली होती. 

बेस्ट प्रवासी ताटकळले -

सकाळी आणि सायंकाळी कोंडी वाढली. त्यामुळे अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ प्रवासाला जास्त लागल्याचे बेस्ट बसच्या प्रवाशांनी सांगितले.

‘बेस्ट’ची ४११ क्रमांकाची वडाळा ते चांदिवली बस या अंतरावरील दोन्ही फेऱ्या तीन तासांत पूर्ण करते. मात्र, शुक्रवारी सकाळी दोन्ही फेऱ्या पूर्ण करण्यास साडेचार तास लागले, अशी माहिती बेस्ट बसच्या वाहकाने दिली.

 उद्योजकांनाही फटका-

धारावीत माेठ्या प्रमाणात उद्याेग, व्यवसाय आहेत. यातील बहुतांशी उद्योजकांना कच्चा मालासह विक्री-खरेदीसाठी मशीद बंदरला यावे लागते. मात्र आता उद्योजकांनाही मोठा वळसा बसणार आहे.

टॅग्स :मुंबईनगर पालिकामध्य रेल्वेरस्ते वाहतूक