Join us  

मंडपाच्या परवानगीसाठी १३१ अर्ज; सुट्टीच्या दिवशी प्रक्रिया सुरू ठेवण्याची मंडळांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2024 11:08 AM

मुंबईमध्ये १२ हजारांहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून,  मंडळांना मंडप उभारणीसाठी पालिकेचा परवाना घेणे बंधनकारक आहे.

मुंबई :गणेशोत्सव मंडप परवानगीसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘एक खिडकी’ योजनेसाठी पहिल्या २ दिवसांत १३२ अर्ज पालिका प्रशासनाला प्राप्त झाले असून, सर्वच गणेशोत्सव मंडळांनी या परवानगीसाठी लगबग सुरू केल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, अनेक मंडळांकडून ११ ऑगस्टपासून गणेशमूर्ती आणण्यास सुरुवात होणार असल्याने ही परवानगी प्रक्रिया जलद गतीने राबवली जावी, अशी मागणी होत आहे. सोबतच पालिकेने ही प्रक्रिया सुटीच्या दिवशीही सुरू ठेवावी आणि त्यासाठी विभागनिहाय मनुष्यबळ कार्यरत ठेवावे, अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीकडून करण्यात आली आहे.

मुंबईमध्ये १२ हजारांहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून,  मंडळांना मंडप उभारणीसाठी पालिकेचा परवाना घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी मंडपाचे आकारमान, तेथील अग्निप्रतिबंधक उपाययोजना आदी माहितीसह अग्निशमन दल, वाहतूक पोलिस, स्थानिक पोलिस ठाण्याचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र सादर करावे लागते.

सलग पाच वर्षे परवानगी कठीण-

१) सरकारी यंत्रणांकडून एकदाही कारवाई न झालेली मंडळे खूप कमी आहेत. 

२) अनेक मंडळांकडून महापालिका, पोलिसांच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे. तसेच करोनाकाळात अनेक मंडळांनी गणेशोत्सव साजरा केलेला नाही. 

३) त्यामुळे बहुसंख्य मंडळांना सलग पाच वर्षे मंडप परवाना मिळणे दुरापास्त ठरणार आहे, असे समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :मुंबईनगर पालिकागणेशोत्सव