Join us

मेट्रो स्थानकावर पोहोचाल सहज... 'मेट्रो ७' मार्गिकेवर १४ पादचारी पूल, दीड वर्षात काम होणार पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2024 9:42 AM

मेट्रो प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित होण्यासाठी एमएमआरडीएकडून मेट्रो ७ मार्गिकेवर १४ पादचारी पूल उभारले जाणार आहेत.

मुंबई : मेट्रो प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित होण्यासाठी एमएमआरडीएकडूनमेट्रो ७ मार्गिकेवर १४ पादचारी पूल उभारले जाणार आहेत. यामधील आकुर्ली मेट्रो स्थानकावरील पादचारी पुलाचे काम येत्या काही महिन्यांत सुरू करण्याच्या दृष्टीने एमएमआरडीएने हालचाली सुरू केल्या आहेत. मेट्रो स्थानकांवर प्रवाशांना सहज आणि सुरक्षित पोहोचता येण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अशा उपाययोजना करते. 

‘गुंदवली ते दहिसर मेट्रो ७ मार्गिका’ ही पश्चिम द्रुतगती मार्गाला समांतर जाते. पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहनांची सतत वर्दळ असते. त्यामुळे हा मार्ग ओलांडून मेट्रो स्थानकावर पोहोचण्यासाठी प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागते. यामधून प्रवाशांना दिलासा मिळावा, मेट्रो स्थानकापर्यंत जाण्याचा त्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी १४ पादचारी पुलांची उभारणी एमएमआरडीए करणार आहे. यातील आकुर्ली मेट्रो स्थानकावर प्रवाशांना सहज जाण्यासाठी या मेट्रो मार्गिकेला पश्चिम द्रुतगती महामार्गाला उत्तर आणि दक्षिण भागाला जोडणारा पादचारी पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. 

पादचारी पुलासाठी ४० कोटींचा खर्च-

आकुर्ली स्थानकातील या पादचारी पुलासाठी ४० कोटी ५९ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. हा पूल तब्बल ३०० मीटर लांब असेल. दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांसाठी एक लिफ्ट बसवली जाणार आहे. पुलावर १५ सीसीटीव्हींची नजर राहील.

दीड वर्षात काम होणार पूर्ण -

आकुर्ली मेट्रो स्थानकाच्या दक्षिण आणि उत्तर भागाला जोडण्यासाठी उभारणार असलेल्या पुलाचे काम दोन ते तीन महिन्यांत सुरू होण्याची शक्यता आहे. त्यानंतर साधारण दीड वर्षात पुलाचे काम पूर्ण होऊन प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल.

१) पादचारी पुलाची लांबी - ३०० मीटर 

२) पादचारी पुलासाठी खर्च - ४० कोटी ५९ लाख रुपये

३) बांधकामाचा कालावधी - १८ महिने

टॅग्स :मुंबईमेट्रोएमएमआरडीए