Join us  

खड्ड्यांमुळे पाच वर्षांत १५८ जणांचा बळी; ३४० अपघातांत ३०९ जण जखमी

By मनीषा म्हात्रे | Published: July 13, 2024 11:06 AM

पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे.

मनीषा म्हात्रे, मुंबई : पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे अपघात तसेच वाहतूक कोंडीचा फटका वाहनचालक आणि प्रवाशांना बसत आहे. गेल्या पाच वर्षांत मुंबईसह राज्यात खड्ड्यांमुळे ३४० अपघातांच्या घटना घडल्या. त्यात १५८ जणांचा बळी गेला, तर ३०९ जण जखमी झाल्याची माहितीराज्य महामार्ग पोलिसांकडील आकडेवारीतून पुढे आली आहे.सध्या मुंबईत अनेक ठिकाणी रस्त्यांचे काँक्रिटीकरण, मेट्रो प्रकल्प अशी विविध कामे सुरू असल्याने वाहतुकीच्या समस्येत भर पडत आहे. त्यातच आता पावसाळ्यात खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग आणखी मंदावत आहे. 

खड्ड्यांमुळे २०१९ ते २०२३ दरम्यान १५८ जणांचा बळी गेला आहे. पावसाळ्यात त्याचे प्रमाण अधिक आहे. २०१९ मध्ये सर्वाधिक १८१ अपघातांची नोंद झाली. त्यामध्ये ७२ जणांचा बळी गेला, तर १६१ जण जखमी झाले. २०२० मध्ये  ६१ अपघातांत ३९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. २०२१ मध्ये ३३ अपघातांत १४, तर २०२२ मध्ये चार अपघातांत चौघांच्या मृत्यूची नोंद झाली. २०२२ मध्ये सर्वांत कमी अपघातांची नोंद झाली. गेल्यावर्षी ६१ अपघातांत २९ जणांचा मृत्यू झाला. तर, ४५ जण गंभीर जखमी झाले.

पोलिसांनीच बुजवले खड्डे...

अपघाताचे संकट टाळण्यासाठी वाहतूक आणि मुंबई पोलिस स्वतः रस्त्यावर उतरून खड्डे बुजवत असल्याचे पाहायला मिळाले आहे. पाठपुरावा करण्यात वेळ घालविण्यापेक्षा स्वखर्चाने खड्डा बुजवलेला बरा, असेही काही अधिकाऱ्यांनी सांगितले.

वेळोवेळी पाठपुरावा-

मुंबईत अनेकदा खड्डे अपघातांना कारणीभूत ठरतात. अशावेळी रस्त्यांवर कुठे खड्डे आढळून आल्यास ते बुजविण्यासाठी तत्काळ संबंधित यंत्रणांसोबत पाठपुरावा करण्यात येत आहे. - एम. रामकुमार, अतिरिक्त पोलिस आयुक्त,  मुंबई वाहतूक पोलीस

गेल्या ५ वर्षांतील आकडेवारी -

१) वर्ष  - २०१९

अपघात- १८१ 

 मृत्यू - ७२

जखमी - १६१

२) वर्ष- २०२०

अपघात - ६१ 

 मृत्यू- ३९   

 जखमी- ४९

३) वर्ष- २०२१  

अपघात- ३३       

मृत्यू - १४    

जखमी- ५३

४) वर्ष- २०२२    

अपघात- ०४       

मृत्यू- ०४    

जखमी- ०१

४) वर्ष- २०२३    

अपघात- ६१    

मृत्यू- २९    

जखमी- ४५

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाखड्डेअपघात