दिवसभरात २ लाख ६० हजार जणांचा प्रवास; मेट्रो २ अ, मेट्रो ७ वर २३ गाड्यांद्वारे सेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2024 11:34 AM2024-06-08T11:34:49+5:302024-06-08T11:38:37+5:30
मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ ही मार्गिका सुरू झाल्यापासून १० कोटी जणांच्या प्रवासाचा टप्पा नुकताच पार केला होता.
मुंबई : डी. एन. नगर ते दहिसर पूर्व मेट्रो २ अ आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो ७ या मार्गिकेने २ लाख ६० हजार एवढ्या आतापर्यंतच्या एका दिवसातील सर्वाधिक प्रवासी संख्येचा टप्पा सोमवारी गाठला. मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ ही मार्गिका सुरू झाल्यापासून १० कोटी जणांच्या प्रवासाचा टप्पा नुकताच पार केला होता. दोन वर्षे आणि दोन महिन्यांच्या कालावधीत या मेट्रो मार्गिकेने ही कामगिरी केली. त्यानंतरही मेट्रो मार्गिकेवरील प्रवासी संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे.
मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ मार्गिकेचा डहाणूकरवाडी ते आरे हा पहिला टप्पा २ एप्रिल २०२० रोजी सुरू झाला. त्यावेळी मेट्रो मार्गिकेला अंधेरी येथील मेट्रो १ मार्गिकेची जोडणी नसल्याने प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत होता. त्यातून पहिल्या आठ महिन्यांत या मेट्रो मार्गिकेवरून केवळ ८९ लाख प्रवाशांनी प्रवास केला होता.
१) या मेट्रोचा दुसरा टप्पा २० जानेवारी २०२३ मध्ये प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला. त्यानंतर या मार्गिकेवरून २० जानेवारी २०२३ ते २० फेब्रुवारी २०२४ दरम्यान ७ कोटी १७ लाख प्रवाशांनी प्रवास केला होता, तर २८ मेपर्यंत पुढील तीन महिने आणि आठ दिवसांत यात आणखी दोन कोटी प्रवाशांची भर पडली होती.
२) गेल्या महिन्यापर्यंत या दोन्ही मेट्रो मार्गिकांवर मिळून दरदिवशी सुमारे २ लाख ४० हजार प्रवासी प्रवास करत होते. दरम्यान सद्य:स्थितीत या मार्गिकेवर २३ मेट्रो गाड्यांच्या माध्यमातून सेवा दिली जात असून, गर्दीच्या वेळी दर साडेसात मिनिटांनी एक गाडी धावत आहे.