दिवसभरात वाढला २१ दिवसांचा पाणीसाठा! जलाशयांचा पाणीसाठा ५३ टक्क्यांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 11:26 AM2024-07-24T11:26:10+5:302024-07-24T11:27:33+5:30
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांच्या परिसरात चांगला पाऊस पडत आहे.
मुंबई : मुंबईलापाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांच्या परिसरात चांगला पाऊस पडत आहे. सोमवारी एकाच दिवसात २१ दिवस पुरेल एवढ्या पाण्याची भर पडली. सातही जलाशयांमध्ये निम्म्याहून अधिक (५३.१२ टक्के) पाणीसाठा जमा झाला. हा पाणीसाठा मुंबई, ठाणे, भिवंडी, निजामपूर आणि मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पुढील १९२ दिवस म्हणजेच २ मार्च २०२५ पर्यंत पुरेल इतका आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सातही जलाशयांतील पाणीसाठा मंगळवारी सकाळी ६ पर्यंत ५३.१२ टक्क्यांवर पोहोचला आहे. सात जलाशयांतून मुंबईला दररोज ३८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. ठाणे, भिवंडी-निजामपूर पालिका क्षेत्रात दररोज १५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. सातही जलाशयांची पाणी साठविण्याची क्षमता १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर इतकी आहे. सध्या सात धरणांत ७ लाख ६८ हजार ८४७ दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाला आहे. २२ जुलै रोजी एका दिवसात जलाशयाच्या साठ्यात ८४ हजार दशलक्ष लिटरची वाढ झाली आहे. यामधील तुळशी तलाव काठोकाठ भरला आहे. सर्वात मोठे भातसा धरण ५२ टक्के भरले असून तानसा धरणदेखील ९१ टक्के भरले आहे.
धरणांमधील पाणीसाठ्यात घट झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महानगरपालिका प्रशासनाने ५ जूनपासून १० टक्के पाणीकपात लागू केली आहे. मात्र, आता धरणांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा असल्यामुळे कपात रद्द करण्याची मागणी होऊ शकते किंवा राजकीय दबावही वाढू शकतो.
धरणातील पाणीसाठा-
१) उर्ध्व वैतरणा- १८.४३ %
२) मोडक सागर- ७५.४६ %
३) तानसा- ९१.५५ %
४) मध्य वैतरणा- ४७.०३ %
५) भातसा- ५२.०७ %
६) विहार- ८८.४० %
७) तुळशी - १०० %
ऑक्टोबरमधील जलसाठ्यावर नियोजन-
१) दरवर्षी १ ऑक्टोबर ही तारीख पाणीपुरवठा नियोजनाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.
२) सर्व तलावांमधील जलसाठा १०० टक्के असल्यास पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने सदर बाब ही समाधानकारक मानण्यात येते.
३) यावर्षी ऑक्टोबर महिन्यातील जलसाठा किती असेल त्यावर पुढील पावसाळ्यापर्यंतचे नियोजन अवलंबून असते, अशी माहिती पालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.