Join us

नगरपथ विक्रेता समितीत २४ जागा महिलांसाठी ; निवडणूक प्रक्रिया ५ ते २९ ऑगस्ट दरम्यान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 11:06 AM

नगरपथ विक्रेता समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून ५ ते २९ ऑगस्ट दरम्यान निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया होणार आहे.

मुंबई : नगरपथ विक्रेता समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून ५ ते २९ ऑगस्ट दरम्यान निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया होणार आहे. दरम्यान, नगरपथ विक्रेता समितीत विविध प्रवर्गांसाठी महिला आरक्षण निश्चित करण्याची सोडत प्रक्रिया महानगरपालिका मुख्यालयात आज पार पडली. समितीत २४ जागा महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.

संपूर्ण मुंबई महानगरासाठी शिखर समितीसह सात परिमंडळांच्या प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण आठ समित्यांमध्ये महिला आरक्षण निश्चितीसाठी ही सोडत आयोजित केली होती. प्रत्येक समितीमध्ये आठ सदस्य असतील. एकूण ६४ सदस्य संख्या असलेल्या या समित्यांमध्ये खुल्या प्रवर्गातील ८, दिव्यांग २, अल्पसंख्याक ५, इतर मागासवर्ग ४, अनुसूचित जाती ३, अनुसूचित जमाती प्रवर्गातील २ जागा याप्रमाणे एकूण २४ जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी एकूण ३५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राखीव जागा-

सोडतीनुसार, शिखर समितीमध्ये खुला, दिव्यांग आणि अल्पसंख्याक, परिमंडळ-१ समितीमध्ये खुला, इतर मागासवर्ग आणि अल्पसंख्याक, परिमंडळ-२ समितीमध्ये खुला, इतर मागासवर्ग आणि अल्पसंख्याक, परिमंडळ-३ समितीमध्ये खुला, अल्पसंख्याक आणि अनुसूचित जाती, परिमंडळ-४ समितीमध्ये खुला, अनुसूचित जमाती आणि दिव्यांग, परिमंडळ-५ समितीमध्ये खुला, अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्ग, परिमंडळ-६ समितीमध्ये खुला, अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्ग तसेच परिमंडळ-७ समितीमध्ये खुला, अनुसूचित जमाती आणि अल्पसंख्याक याप्रमाणे महिलांसाठी जागा राखीव झाल्या आहेत.

३५० कर्मचारी नियुक्त-

१) एकूण ३२ हजार ४१५ मतदार, ४२ मतदान केंद्रे आणि ३५० कर्मचारी

२) महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नोंदणीकृत नगरपथ विक्रेता मतदारांची एकूण संख्या -३२ हजार ४१५

३) निवडणुकीसाठी मतदान केंद्रे - ४२

४) संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यासाठी एकूण ३५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती

५) सुरक्षा कर्मचारी तैनात - १७५

८ समित्यांसाठी निवडणूक-

१) महानगरपालिका कार्यक्षेत्रात १ शिखर समिती आणि ७ परिमंडळाच्या प्रत्येकी एक याप्रमाणे (७ समिती) एकूण ८ समित्यांसाठी निवडणूक होणार आहे. प्रत्येक समितीतील सदस्यांची एकूण संख्या ८ आहे.

२) यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पसंख्याक, इतर मागासवर्ग, दिव्यांग (प्रत्येकी १) आणि खुला (३) या प्रवर्गांनुसार सदस्यरचना निश्चिती केलेली आहे. 

३) यापैकी एक तृतीयांश म्हणजेच ३ जागा प्रत्येक समितीत महिलांसाठी आरक्षित आहेत.

टॅग्स :मुंबई