टीबी रुग्णालयातच ‘टी बी’ने रोज ३ मृत्यू; माहिती अधिकारातून बाब आली उजेडात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 09:35 AM2024-09-24T09:35:24+5:302024-09-24T09:37:36+5:30
महापालिकेच्या शिवडी येथील टीबी रुग्णालयात ‘टीबी’ने रोज २ ते ३ मृत्यू होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : महापालिकेच्या शिवडी येथील टीबी रुग्णालयात ‘टीबी’ने रोज २ ते ३ मृत्यू होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. चेतन कोठारी या सामाजिक कार्यकर्त्याने मागितलेल्या माहिती अधिकारातून ही माहिती उजेडात आली.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, हा आजार उपचार घेतल्याने बरा होतो. मात्र काही काळ उपचार घेऊन रुग्ण मध्येच या औषधाचा कोर्स बंद करतात. त्यामुळे त्यांना त्या औषधांचा रेसिस्टन्स होऊन प्रकृती गुंतागुंत निर्माण होते. आजही टीबी आजाराचे रुग्ण मोठ्या संख्येने मुंबईत सापडत आहेत. अशा रुग्णांना उपचार मिळावेत याकरिता महापालिकेचे टीबी आजारावरील स्वतंत्र रुग्णालय आहे. या ठिकाणी केवळ या आजारावरील उपचार केले जातात.
आपल्याकडे आजही टीबी आजाराबद्दल घेऊन खूप गैरसमज आहे. ‘टीबी’चे निर्मूलन करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर मोठे प्रयत्न सुरू आहे. तसेच आजाराच्या कोर्ससाठी नवीन उपचार पद्धती विकसित केली जात आहे. तसेच या आजराच्या निर्मूलनासाठी राष्ट्रीय कार्यक्रम आखण्यात आला आहे. या आजारावरील सर्व चाचण्या आणि औषधोपचार सरकारी रुग्णालयात मोफत केले जातात. तसेच या आजरावरील औषधाचा कोर्स सहा महिने ते नऊ महिने इतका असल्याने नियमितपणे रुग्णालयातर्फे रुग्णांचा फॉलोअप घेतला जात आहे.
तीन वर्षांतील मृत्यू-
१) २०२१-९७४
२) २०२२-९५९
३) २०२३-८५५
४) २०२४- ३९७