एका दिवसात पाणीसाठ्यात ४ % वाढ; धरण क्षेत्रांमध्ये ७०६ मिमी पावसाची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 09:41 AM2024-07-08T09:41:04+5:302024-07-08T09:43:04+5:30
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रांत पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यामुळे पाण्याच्या पातळीत हळूवार वाढ होत आहे.
मुंबई : मुंबईलापाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रांत पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यामुळे पाण्याच्या पातळीत हळूवार वाढ होत आहे. १५ दिवसांपूर्वी धरणांत ७० हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा (५.३० टक्के) होता. सतत पडणाऱ्या पावसामुळे हा साठा १० टक्क्यांपर्यंत पोहोचला. मात्र, शनिवारपासून धरण क्षेत्रांत ७०६ मिमी पाऊस झाल्याने हा जलसाठा चार टक्क्यांनी वाढून तो सुमारे १४.५२ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे सध्या सातही धरणांमध्ये २ लाख १० हजार २०७ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे.
यंदा कडक ऊन्हामुळे झालेले बाष्पीभवन आणि संपूर्ण जून कोरडा गेल्याने पाणीपातळीत घट झाली. त्यामुळे मुंबईत ५ जूनपासून १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली. मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या धरणांतून मुंबईला दररोज ३ हजार ९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मात्र, शनिवारपासून धरण क्षेत्रांत पावसाची दमदार इनिंग सुरू झाली. पावसाचा जोर आणखी वाढल्यास मुंबईकरांची पाणीकपातीतून सुटका होईल, असा विश्वास पालिकेच्या जल विभागाने व्यक्त केला.
पाणीकपातीमुळे मुंबईच्या सर्व भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. काही भागांना पाणी मिळत नसल्याकडे आमदार ॲड. आशीष शेलार यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात लक्ष वेधले. अन्य आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला. त्यामुळे याची दखल घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुंबई महापालिका जल अभियंत्यांनी तातडीने मुंबईतील पाणी पुरवठ्याची माहिती संबंधित मंत्र्यांमार्फत सादर करण्याचे निर्देश
दिले.
‘बांधकामांचा पाणीपुरवठा बंद करा’-
मुंबईत सुमारे २,५०० हून अधिक इमारतींचे बांधकाम सुरू असून, त्यासाठी पालिकेकडून आजही सुरळीत पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपचे दक्षिण मध्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना निवेदन देऊन तलावांतील पाणीपातळी वाढेपर्यंत इमारतींच्या बांधकामांना पाणीपुरवठा बंद करण्याची मागणी केली आहे.
धरणांतील आतापर्यंतचा पाऊस-
१) अप्पर वैतरणा-४८७ मिमी
२) मोडक सागर- ६३६ मिमी
३) तानसा- ६७४ मिमी
४) मध्य वैतरणा - ६८४ मिमी
५) भातसा- ८८१ मिमी
६) विहार- ६१२ मिमी
७) तुळशी - ७४५ मिमी
एकूण- ४७१९ मिमी