Join us

गोखले पुलाला ४ जुलैचा मुहूर्त; डेडलाइन पुन्हा हुकली, लोड टेस्टनंतर व्हीजेटीआयची एनओसी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2024 9:33 AM

अंधेरी पूर्व व पश्चिम प्रवासासाठी हायड्रॉलिक जॅक आणि 'एमएस स्टूल पॅकिंग'चा वापर करून बर्फीवाला आणि गोखले उड्डाणपुलाच्या जोडणीचे काम पालिकेने पूर्ण केले आहे.

मुंबई : गोखले पूल वाहतुकीस सुरू होण्याची १ जुलैची डेडलाइनही हुकली आहे. वाहतूक व्यवस्थापनाची कामे आणि चाचण्या पुढील दोन दिवसांत पालिकेकडून पूर्ण केल्या जाणार आहेत. त्यानंतर ४ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेपासून जुहू दिशेने अंधेरी असा पश्चिम-पूर्व प्रवास करण्याचा पर्याय देणारी मार्गिका खुली केली जाणार आहे.

अंधेरी पूर्व व पश्चिम प्रवासासाठी हायड्रॉलिक जॅक आणि 'एमएस स्टूल पॅकिंग'चा वापर करून बर्फीवाला आणि गोखले उड्डाणपुलाच्या जोडणीचे काम पालिकेने पूर्ण केले आहे. त्यानंतर यावर 'नॉन डिस्ट्रक्टिव्ह' आणि 'क्यू' या दोन महत्त्वपूर्ण चाचण्यांसोबत 'लोड टेस्ट' देखील घेण्यात आली.

या चाचण्यांचे परिणाम सकारात्मक आल्यानंतर वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेने (व्हीजेटीआय) पालिकेला या मार्गिकेवर वाहतक सरू करण्यासहरकत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र दिले. या पार्श्वभूमीवर गोखले पुलाची १ जुलैची डेडलाइन हुकली असली तरी वाहतूक व्यवस्थापनाची कामे आणि चाचण्या पुढील दोन दिवसांत पालिकेकडून पूर्ण केल्या जाणार आहेत. अंधेरी परिसराला पूर्व आणि पश्चिम जोडणारा वाहतुकीसाठी महत्त्वाचा दुवा असलेल्या गोपाळकृष्ण गोखले पुलाच्या उंचीशी समांतर अशा पातळीवर सी. डी. बर्फीवाला उडाणपूल जोडणीसाठी तांत्रिक सल्लागारांच्या देखरेखीखाली सर्व कामे विहित मुदतीत पूर्ण करण्यात येत आहेत. या अंतर्गत सी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलाचा भाग एका बाजूला १,३९७ मिलिमीटर आणि दुसऱ्या बाजूला ६५० मिमीवर उचलण्यात आला आहे.

या जोडणीच्या कामासाठी गत दोन महिन्यांपासून सूक्ष्मस्तरीय नियोजन सुरू होते. हे काम आव्हानात्मक असूनदेखील दिवस रात्र सुरू असल्यामुळे केवळ ७८ दिवसांत पर्ण झाले आहे. 

क्युरिंगसाठी १४ दिवसांचा अवधी-

'कॉक्रिट क्युरिंग'च्या कामासाठी आवश्यक १४ दिवसांचा अवधी देण्यात आला. या क्युरिंगसाठी उच्च दर्जाच्या काँक्रीट तंत्रज्ञानाचा वापर केला होता. क्युरिंगसोबतच समांतर अशा पद्धतीने जोडणी सांध्याचे कामदेखील पूर्ण केले आहे. त्यानंतर पुलावर विशिष्ट तासांच्या कालावधीत 'लोड टेस्ट' करण्यात आली. पुलांवर वाहतूक सुरू होण्याच्या दृष्टीने आवश्यक ते काम यापूर्वी निर्धारित करण्यात आलेल्या टप्प्यांनुसार पूर्ण करण्यात आले आहे.

व्हीजेटीआय आणि आयआयटीची मदत-

१) बर्फीवाला पुलाची पातळी उचलण्याची कार्यपद्धती व आराखडा हा व्हीजेटीआय आणि आयआयटी मुंबई यांच्यामार्फत करण्यात आला आहे.

२) पूल जोडणीची कार्यपद्धती व्हीजेटीआयकडून तयार केली आयआयटीने त्यात सुधारणा केल्या. पूल वाहतुकीसाठी सुरळीत, संरचनात्मकदृष्ट्या सुरक्षित असल्याचे 'व्हीजेटीआय'ने घोषित केले.

बर्फीवाला पुलाचा जॅक काढला-

१) बर्फीवाला पुलासाठी देण्यात आलेल्या जॅकचा आधार काढण्यात आला. त्यामुळे बर्फीवाला पूल पूर्णपणे खांबांच्या आधारावर स्थित आणि सुस्थितीत असल्याची माहिती पूल विभागाने दिली आहे.

अवजड वाहनांसाठी बंदी-

गोखले पुलाच्या दुसऱ्या टप्यातील काम सध्या रेल्वे भागातील हद्दीत सुरू आहे. त्यामुळे सी. डी. बर्फीवाला आणि गोखले पुलावर फक्त हलक्या वाहनांना प्रवेशासाठी मुभा देण्यात आली आहे. अवजड वाहनांसाठी उंची रोधक (हाइट बॅरिअर) बसविण्यात आलेले आहेत. दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी प्रवेश देण्यात येणार आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाआयआयटी मुंबईअंधेरीरस्ते वाहतूक