जुने द्या, नवे साेने घ्या! भांडीवाल्या महिलेकडून ४ लाखांची फसवणूक; चौघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 10:09 AM2024-06-25T10:09:25+5:302024-06-25T10:12:12+5:30
वांद्रे परिसरात जुन्या दागिन्यांच्या बदल्यात नवे दागिने मिळवून देते, असे सांगत भांडीवाल्या महिलेने चार महिलांची लाखो रुपयांची फसवणूक केली.
मुंबई : वांद्रे परिसरात जुन्या दागिन्यांच्या बदल्यात नवे दागिने मिळवून देते, असे सांगत भांडीवाल्या महिलेने चार महिलांची लाखो रुपयांची फसवणूक केली. जानेवारी महिन्यात घडलेल्या या गुन्ह्यात खेरवाडी पोलिसांनी चौघांना अटक केली. मनोज पहारी, राजकुमार मल्हार, अनिता देवी, किरण मल्हार, अशी आरोपींची नावे आहेत.
वांद्रे पूर्वच्या संत ज्ञानेश्वरनगरमध्ये राहणारी चंदा जैस्वाल (३७) या शेजारच्या अन्य तीन महिलांसोबत गप्पा मारत बसल्या होत्या. त्यावेळी ४५ वर्षांची भांडीवाली महिला त्या ठिकाणी जुनी भांडी देऊन नवीन भांडी देत असल्याचे दिसले. त्यांनी तिला आवाज देऊन बोलावले. जुनी भांडी देऊन तिच्याकडून नवीन भांडी घेतली. त्यावेळी महिलेने चंदासह अन्य महिलांना जुन्या बदल्यात नवीन सोन्याचे दागिने देण्याचे आमिष दाखविले. तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवत चौघींनी दागिने काढून रुमालात ठेवून दिले. ४ वाजेपर्यंत परत येते, असे सांगून भांडीवालीने तेथून पळ काढला. बराच वेळ झाला तरी भांडीवाली परत आली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलांनी खेरवाडी पोलिसांत तक्रार केली.
आरोपींना कोठडी-
१) परिमंडळ ८ चे पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मुळिक यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक पावशे, शिंदे, कांबळी आणि परदेशी यांनी तपास सुरू केला.
२) त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले तपासादरम्यान आरोपी झारखंडला पळून जाणार असल्याची माहिती मिळाली. तपास करून आरोपींना अटक केली. हे आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत.