Join us  

नऊ महिन्यांत पावसाळी आजाराचे ४१ मृत्यू; मुंबईत झिकाचा रुग्ण, प्रकृती स्थिर  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2024 9:44 AM

पावसाळी आजारांची रुग्णसंख्या दिवसागणिक वाढत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पावसाळी आजारांची रुग्णसंख्या दिवसागणिक वाढत आहे. नऊ महिन्यांत मुंबईत पावसाळी आजाराचे ४१ मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. दरम्यान, मुंबईत झिकाचा रुग्ण आढळून आला आहे. रुग्ण महिला ६३ वर्षांची असून तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आहे. महिलेची प्रकृती स्थिर असून तिला कोणत्याही प्रकारचे लक्षणे नाहीत.  

गेल्या  नऊ महिन्यांत शहरात सर्वाधिक मृत्यू लेप्टोस्पायरोसिस आजाराने १८, तर त्याखालोखाल १२ मृत्यू डेंग्यूमुळे झाले आहेत. त्यासोबत मलेरिया आणि स्वाईन फ्लू या आजारांमुळे प्रत्येकी पाच, तर हेपेटायटिसमुळे एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अनियमित पडणाऱ्या पावसामुळे डासांची पैदास होण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. नागरिकांनी आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता राखावी आणि पाणी साचू देऊ नये, असे आवाहन पालिकेने केले आहे.  

झिका हा एडिस डासांमार्फत पसरणारा एक विषाणूजन्य आजार आहे. जो दिवसा चावतो. बहुसंख्य रुग्णांमध्ये कोणतेही लक्षणे आढळत नसली तरी झिका आजाराची लक्षणे सर्वसाधारणपणे सौम्य स्वरूपाची असतात. त्यामध्ये ताप येणे, पुरळ येणे, डोळे येणे, डोकेदुखी यांचा समावेश होतो. या आजारांमध्ये मृत्यूचे प्रमाण अंत्यत नगण्य आहे. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नसल्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.    

साथीचे आजार व रुग्ण- ( सप्टेंबरमधील रुग्णसंख्या )

१) मलेरिया- १,२६१

२) डेंग्यू- १,४५६

३) चिकुनगुनिया- १५६

४) लेप्टो- ७५ 

५) गॅस्ट्रो- ४६६

६) हेपेटायटिस (ए,ई) - १२९

७) स्वाइन फ्लू- ६२

८) झिका- १

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाझिका वायरसआरोग्य