मुंबई : कोटक महिंद्रा म्युच्युअल फंडचा एक्झिक्युटिव्ह म्हणून भासवणाऱ्या एका व्यक्तीने ७३ वर्षीय व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबाची ४४.५ लाख रुपयांना गंडवले. त्याने ज्येष्ठ नागरिकाला खासगी गुंतवणूक फर्ममध्ये पैसे जमा करण्यास प्रवृत्त करत हा प्रकार केल्या प्रकरणी जुहू पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादीने ऑक्टोबर २०२० मध्ये त्यांच्या एका मुलीने २.५ लाख रुपये गुंतवले होते. फेब्रुवारी आणि डिसेंबर २०२१ मध्ये, तिला अनुक्रमे २७ हजार २६७ रुपये आणि २९ हजार ०५९ रुपये मिळाले. हा लाभांश गणेश एंटरप्रायझेस कंपनीने तिच्या खात्यात हस्तांतरित केला होता, ज्याद्वारे तिने गुंतवणूक केली होती. गुंतवणुकीच्या योजनांनी प्रभावित होऊन, तक्रारदार, त्यांची पत्नी, मुलगी आणि दोन जावई यांनी जून २०२१ मध्ये गणेश एंटरप्रायझेस कंपनीमार्फत ४४.५० लाख रुपयांची गुंतवणूक करण्याच्या उद्देशाने ती रक्कम कंपनीच्या बँक खात्यात जमा केली हाेती.
२०२३ पर्यंत मिळाला नफा :
तक्रारदार आणि त्याच्या कुटुंबातील सदस्याला मार्च २०२३ पर्यंत नफा मिळणार होता, परंतु त्यांना तो मिळाला नाही. त्यानंतर तक्रारदाराने बँकेला पत्र लिहिले. बँकेच्या गुंतवणूक विभागातील वरिष्ठ व्यवस्थापकाने तक्रारदाराला उत्तर दिले की, तक्रारदार आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावाने म्युच्युअल फंडात पैसे गुंतवलेले नाहीत. आरोपी व्यक्ती, चंद्रमोहन मेहरोत्रा, गणेश एंटरप्रायझेस कंपनीचे संचालक, एसके फायनान्स, म्युच्युअल फंड आणि अॅसेट मॅनेजमेंटसाठी बँकेच्या पॅनेलवर नाहीत असेही पोलिसांनी सांगितले.