मुंबई : एमबीए आणि एमएमएस या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी यंदा अर्ज करणाऱ्यांची संख्या घटली आहे. यंदा या अभ्यासक्रमासाठी ५५ हजार ५८३ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले असून गेल्यावर्षीच्या तुलनेत त्यात ८,८७० ने घट नोंदविण्यात आली आहे.
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्षाने एमबीए आणि एमएमएस या पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी ९ ते ११ मे दरम्यान परीक्षा घेतली होती. तिचा निकाल १६ मे रोजी जाहीर करण्यात आला. मात्र, प्रवेश नोंदणीस आता जुलै महिना उजाडला आहे. सीईटी सेलने १२ ते ३१ जुलैदरम्यान ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली. यामध्ये ५५ हजार ५८३ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. गेल्यावर्षी हीच संख्या ६४ हजार ४५३ एवढी होती. त्यामुळे यंदा प्रवेशाची चुरस कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान, गेल्यावर्षी एमबीएसाठी ४४ हजार ९२ जागा उपलब्ध आहेत. त्यातील ३७ हजार ५७ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत, तर ७ हजार ३५ जागा रिक्त राहिल्या होत्या. यंदा काहीसे कमी अर्ज आले आहेत. त्यातून रिक्त जागांची संख्या वाढण्याची चिन्हे आहेत. मात्र, नामांकित कॉलेजांमध्ये प्रवेशासाठी चुरस राहण्याची चिन्हे आहेत.