पर्यटन संचालनालयालाच गंडा, १५ फेक चेकद्वारे ६८ लाख वळते, चौघांविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 10:32 AM2024-03-13T10:32:47+5:302024-03-13T10:33:58+5:30
मरीन ड्राइव्ह पोलिसांकडून तपास सुरू.
मुंबई : बनावट धनादेशाद्वारे राज्याच्या पर्यटन संचालनालयाच्या बँक खात्यातून ६८ लाख रुपये अन्य खात्यात वळवल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. मरीन ड्राइव्ह पोलिसांनी चार जणांविरूद्ध गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे.
मुख्य लेखा अधिकारी विठल गंगाराम सुडे (५३) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सोमवारी गुन्हा नोंदवला आहे. त्यात एकूण ६८ लाख ६७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. १३ ते १६ फेब्रुवारीदरम्यान राज्य पर्यटन संचालनालय यांच्या बँक ऑफ महाराष्ट्र, मंत्रालय शाखा, नरिमन पॉईंट येथील चालू खात्यात बनावट धनादेश तयार करून बोगस शिक्के व बोगस स्वाक्षऱ्यांचा वापर करत १५ धनादेशाद्वारे हे पैसे वळवल्याचे उघडकीस आले आहे. व्यवहारात गोंधळ वाटताच पर्यटन विभागाने तत्काळ बँकेला माहिती देत पोलिसांकडे अज्ञात व्यक्तीविरूद्ध तक्रार दिली.
हे चौघे नेमके कोण ?
१) तपासात, आकाश डे यांनी २२ लाख ७९ हजार, तपन मंडल यांनी २२ लाख ७३ हजार, लक्ष्मी पाल यांनी १३ लाख ९१ हजार आणि आनंदा मंडल यांनी नऊ लाख २४ हजार रुपये त्यांच्या खात्यावर परस्पर वळते केल्याचे समोर आले.
२) यामध्ये एकूण ६८ लाख ६७ हजार रुपयांचा अपहार करून कार्यालयाची फसवणूक केल्याप्रकरणी आकाश डे, तपन मंडल, लक्ष्मी पाल, आनंदा मंडल यांच्याविरूद्ध गुन्हा नोंदवला आहे.
३) हे चौघे कोण आहेत? यामागे नेमका कुणाचा हात आहे? याबाबत पोलिस अधिक चौकशी करत आहेत.
शिक्षण विभागाच्या खात्यातून पैसे गायब - पर्यटन विभागाप्रमाणे राज्याच्या शिक्षण विभागाच्या याच बँक खात्यातून लाखो रुपये काढल्याचा धक्कादायक प्रकार तपासात समोर येत आहे. याप्रकरणी संबंधित विभागाकडून तक्रार देत, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
...अन् पैसे पुन्हा खात्यात
पैसे काढल्याचा संदेशाबाबत संशय आल्याने बँक स्टेटमेंट काढण्यात आले. संबंधित बँक व्यवहार विभागाकडून झाले नसल्याबाबत बँकेला सूचित करत, १६ तारखेला तत्काळ पोलिसांत तक्रार देण्यात आली. त्यानुसार, बँकेने रक्कम खात्यात जमा केली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. संबंधित बँक खाते गोठविले असल्याचीही माहिती आहे. - विठ्ठल सुडे, मुख्य लेखाधिकारी, पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र राज्य