मुंबई : कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो १४ मार्गिका सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर उभारण्यासाठी सुमारे ७५ हेक्टर जमीन व्यावसायिक वापरासाठी लागणार आहे. त्यातून प्रकल्पाच्या उभारणीसाठी सरकारच्या हिश्श्याच्या निधीची तरतूद केली जाणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव सल्लागाराने सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मेट्रो १४ मार्गिकेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) मिलान मेट्रो या इटालियन कंपनीने तयार केला आहे. या प्रकल्प अहवालात ही मेट्रो मार्गिका पीपीपी तत्त्वावर उभारावी, असा प्रस्ताव देण्यात आला आहे. त्यानुसार सुमारे ३९ किमी लांबीच्या या मेट्रो मार्गिकेच्या उभारणीसाठी सुमारे १८ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) हा प्रकल्प अहवाल आयआयटी मुंबईकडे तपासणीसाठी पाठविला आहे. आयआयटी मुंबईकडून अहवाल प्राप्त होताच मेट्रो मार्गिकेसाठी पुढील निर्णय घेतला जाणार आहे, असे अधिकाऱ्यांनी नमूद केले.
पीपीपी तत्त्वावरील यापूर्वीची स्थिती-
१) पीपीपी तत्त्वावर यापूर्वी वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो १ मार्गिकेची उभारणी केली होती. मात्र, ही मेट्रो मार्गिका आर्थिकदृष्ट्या तोट्यात आहे. त्यामुळे ही मार्गिका उभारणाऱ्या रिलायन्स इन्फ्रा या कंपनीने मेट्रो मार्गिकेचे अधिग्रहण करावे, असा प्रस्ताव एमएमआरडीएला दिला आहे.
२) त्यातून आधीची मेट्रो मार्गिका तोट्यात असताना पीपीपी तत्त्वावर दुसरी मेट्रो मार्गिका उभारणे व्यवहार्य असेल का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू-
मेट्रो मार्गिकेच्या उभारणीसाठी जमिनीचा व्यावसायिक पद्धतीने विकास साधून प्रकल्पासाठी येणाऱ्या खर्चाची सोय करण्याचा विचार आहे. त्यासाठी या मेट्रो मार्गिकेच्या प्रस्तावित मार्गात जागा उपलब्ध होऊ शकते का? याचीही तपासणी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मेट्रो-१४ मधील असा असेल मार्ग-
१) मार्ग - कांजूरमार्ग - घणसोली, महापे, अंबरनाथ, बदलापूर
२) ३९ किमी लांबी - सुमारे
३) प्रकल्पाचा खर्च - सुमारे १८ हजार कोटी