'मेट्रो ३ वर' ९५ किमी वेगाने गाडीची चाचणी; 'आरडीएसओ'कडून तपासणी पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 10:54 AM2024-06-26T10:54:41+5:302024-06-26T10:56:04+5:30
कुलाबा ते सीप्झ मेट्रो-३ मार्गिका सुरू होण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पडले आहे.
मुंबई :कुलाबा ते सीप्झ मेट्रो-३ मार्गिका सुरू होण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पडले आहे. या मेट्रोच्या आरे ते बीकेसी या पहिल्या टप्प्यातील मार्गिकेच्या मेट्रो गाड्यांची न तपासणी रिसर्च डिझाइन अँड स्टैंडर्डस ऑर्गनायझेशन (आरडीएसओ) संस्थेमार्फत पूर्ण करण्यात आली आहे.
त्यामुळे पुढील तपासणीसाठी कमिशनर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टी (सीएमआरएस) पथकाला बोलविण्यात येणार आहे. यावेळी मेट्रो ३ मार्गिकेवर ९५ किमी वेगाने गाडी चालवून पाहण्यात आली.
मेट्रो-३ मार्गिकेचा आरे ते बीकेसी हा मार्ग पहिल्या टप्प्यात मुंबईकरांच्या सेवेत दाखल केला जाणार आहे. यासाठी 'आरडीएसओ' संस्थेतील जॉइंट डायरेक्टर पदाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली १२ अधिकाऱ्यांच्या पथकाने नुकतीच मेट्रो- ३ मार्गिकेवरील गाड्यांची तपासणी पूर्ण केली. यादरम्यान 'आरडीएसओ' पथकाकडून मेट्रो गाडीच्या 'ऑसिलेशन' चाचण्या घेण्यात आल्या. 'आरडीएसओ' पथकाकडून आता याचा अहवाल रेल्वे मंडळाकडे पाठविला जाईल. त्यानंतर 'एमएमआरसी'ला मेट्रो गाड्या चालविण्यासाठी 'आरडीएसओ'कडून हिरवा झेंडा दाखविला जाईल.
मेट्रो ३ मार्गिका -
१) एकूण स्थानके -२७
पहिला टप्पा आरे ते बीकेसी-
१) पहिल्याटप्प्यात वाहतूक सुरू होणारी स्थानके- १०
२) मेट्रो मार्गिकेसाठी खर्च - ३७ हजार कोटी रुपये
ऑगस्टमध्ये धावणार?
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने इलेक्ट्रिक यंत्रणा आणि मेट्रो गाड्यांची सिग्नलिंग यंत्रणेबरोबर एकत्रित चाचणी सुरू केली आहे. 'एमएमआरसी'कडून अंतिम तपासणीसाठी 'सीएमआरएस' पथकाला पाचारण केले जाणार आहे.
'सीएमआरएस'कडून प्रमाणपत्र प्राप्त होताच मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो मार्गिका सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यातून सर्व चाचण्या पूर्ण होऊन ही मेट्रो ऑगस्टमध्ये धावण्याची शक्यता वर्तविली जात आहे.