Join us

मुंबईत घर खरेदीला ‘ब्रेक’; सप्टेंबरमध्ये ९,१६७ मालमत्तांची विक्री, तब्बल १९ टक्क्यांची घट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2024 9:47 AM

गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात मुंबईत एकूण १०,६९४ मालमत्तांची विक्री झाली होती. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गेल्या दीड वर्षांपासून मुंबईत जोमाने सुरू असलेल्या मालमत्ता विक्रीला सप्टेंबर महिन्यात मात्र ब्रेक लागला असून या महिन्यात येथे एकूण ९,१६७ मालमत्तांची विक्री झाली आहे. सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत या विक्रीमध्ये १९ टक्क्यांची घट झाली आहे. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात मुंबईत एकूण १०,६९४ मालमत्तांची विक्री झाली होती. 

चालू वर्षाच्या ऑगस्ट महिन्यात मुंबईत ११ हजार ६३१ मालमत्तांची विक्री झाली होती. त्या तुलनेत सप्टेंबरमध्ये विक्रीमध्ये २१ टक्क्यांची घट झाली आहे.  मालमत्तांच्या विक्रीत घट झाल्याचा फटका सरकारला मुद्रांक शुल्काद्वारे मिळणाऱ्या महसुलावरदेखील झाला आहे. सप्टेंबर महिन्यात सरकारला मालमत्ता विक्रीद्वारे एकूण ८९२ कोटी रुपयांचा महसूल मुद्रांक शुल्काच्या रूपाने मिळाला आहे. 

मालमत्ता खरेदी पुन्हा तेजी गाठेल...

सप्टेंबर महिन्यात विक्री घटण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे सध्या पितृपक्ष सुरू आहे. बहुतांश लोक पितृपक्षामध्ये महत्त्वाची खरेदी टाळतात. त्याचाच फटका विक्री घटण्यास बसला असल्याचे विश्लेषण तज्ज्ञांनी केले आहे. 

दरम्यान, आगामी काळातील नवरात्र आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मालमत्ता खरेदी पुन्हा एकदा तेजीत येत नवा विक्रम गाठेल, असादेखील अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. 

९ महिन्यांत १ लाख ५ हजार मालमत्तांची विक्री-

१) चालू वर्षात जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीमध्ये आतापर्यंत मुंबईत १ लाख ५ हजार ६६४ मालमत्तांची विक्री झाली आहे. 

२) राज्य सरकारला ८८९२ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. गेल्यावर्षीच्या याच नऊ महिन्यांच्या कालावधीच्या तुलनेत ही वाढ १२ टक्के आहे तर महसुलात झालेली वाढ ही ६ टक्के अधिक आहे. 

३) गेल्यावर्षी जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीमध्ये मुंबईत १ लाख मालमत्तांची विक्री झाली होती.

८० टक्के निवासी मालमत्ता-

सप्टेंबर महिन्यातदेखील विक्री झालेल्या मालमत्तांमध्ये ८० टक्के प्रमाण हे निवासी मालमत्तांचे आहे तर २० टक्क्यांमध्ये व्यावसायिक मालमत्तांचा समावेश आहे. 

टॅग्स :मुंबईबांधकाम उद्योग