चोराचे जादूचे खेळ आणि ५३ हजार गुल! दुकानदाराची बोरिवली पोलिसांकडे तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 09:52 AM2024-09-13T09:52:28+5:302024-09-13T10:01:17+5:30
मंदिरात चढावा देण्याच्या बहाण्याने जादूच्या खेळासारखी हातचलाखी करत एका भामट्याने दुकानदाराची ५३ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार बोरीवलीत उघड झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मंदिरात चढावा देण्याच्या बहाण्याने जादूच्या खेळासारखी हातचलाखी करत एका भामट्याने दुकानदाराची ५३ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार बोरीवलीत उघड झाला आहे. याप्रकरणी बोरिवलीपोलिस ठाण्यात बीएनएस कायद्याचे कलम ३१८(४) अंतर्गत एका अनोळखी भामट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार उमरजी छेडा (६८) यांच्या स्टेशनरी दुकानात ११ सप्टेंबर रोजी एक अनोळखी व्यक्ती आला. त्याने तेथेच नवीन दुकानाचा गाळा घेतला असून व्यापारात वृद्धी व्हावी यासाठी साईबाबा मंदिरात चढावा द्यायचा आहे, असे सांगत छेडा यांच्याकडे मंदिराचा पत्ता विचारला. पत्ता कळल्यानंतर मंदिर लांब असल्याने ‘तुम्हीच मंदिरात चढावा द्या’, असे सांगत त्याने छेडा यांना ११०० रुपये दिले.
त्यानंतर पैसे चढवण्यापूर्वी नोटांना सोन्याचा स्पर्श केल्यास व्यापार चांगला चालतो, असे म्हणत छेडा यांच्याकडे सोने असेल तर त्याचा पैशांना स्पर्श करा, अशी विनंती या भामट्याने केली. छेडा यांनीही त्याच्यावर विश्वास ठेवत पैशांना स्पर्श करण्याच्या हेतूने स्वतःच्या गळ्यातील सोन्याची चैन काढली.
त्यानंतर दुकानातील पैशांनाही चढावा आणि या सोन्याचा स्पर्श झाला तर तुमच्या व्यापारातही वृद्धी होईल, असे त्याने सांगितले तेव्हा छेडा यांनी गल्ल्यामधील ८.५ हजार रूपये काढलेे. हे सगळे एका कागदात गुंडाळून परत देतो, असे सांगत त्याने स्वत:कडील फुले त्यात टाकत कागदाची पुरचंडी बांधली. आणि नमस्कार करून तेथून निघून गेला. छेडा यांनी कागद उघडून पाहिला असता त्यात नुसती फुले सापडली. तेव्हा स्वत:ची फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. पण तोपर्यंत भामट्याने तेथून पळ काढला होता.