अमराठी नामफलक; सव्वा कोटीचा दंड वसूल; पालिकेची आठ महिन्यांतील कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 10:23 AM2024-08-09T10:23:16+5:302024-08-09T10:27:10+5:30
दुकानांचे नामफलक मराठी भाषेत लावण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असतानाही अनेक दुकानदारांचा मुजोरपणा कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबई : दुकानांचे नामफलक मराठी भाषेत लावण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असतानाही अनेक दुकानदारांचा मुजोरपणा कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा दुकानदारांवर पालिकेने दंडात्मक कारवाई केली असून, आतापर्यंत याप्रकरणी एक कोटी ३५ लाख दंड वसूल करण्यात आला आहे.
नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२४ या कालावधीत पालिकेने कारवाई केली आहे. मराठी नामफलक लावणे बंधनकारक असतानाही मुंबईत या नियमांची अंमलबजावणी होत नव्हती. नामफलक मराठीतून लावावे, यासाठी मनसेने आंदोलनेही केली. व्यापारी संघटनेने या नियमाला न्यायालयात आव्हान दिले होते. मागील वर्षी सर्वोच्च न्यायालयाने दुकानदारांना पालिकेचे नियम पाळावेच लागतील व नामफलक मराठीत लावावेच लागतील, असा आदेश दिला होता. त्यानंतर पालिकेने नामफलक लावण्यासाठी दुकानदारांना एक महिन्याची मुदत दिली.
३,३८८ दुकानांचे फलक मराठीतून नाहीच-
१) मुदत संपल्यानंतर पालिकेने जवळपास लाखभर दुकाने आणि आस्थापनांची पाहणी केली. त्यासाठी मुंबईच्या २४ वॉर्डात प्रत्येकी दोन, याप्रमाणे ४८ अधिकारी नियुक्त केले. ज्या दुकानांवर मराठीतून नामफलक नव्हते, त्या दुकानदारांना आधी नोटिसा आणि त्यानंतर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
२) आतापर्यंत ३,३८८ दुकानदारांनी नामफलक मराठीतून लावले नसल्याचे आढळून आले. मलबार हिल, ग्रँट रोड, एस वॉर्डमधील भांडुप, विक्रोळी, जी दक्षिणमध्ये वरळी, प्रभादेवी, एच पश्चिममधील वांद्रे, खार, जी उत्तरमध्ये दादर, सायन आणि ई वॉर्डमधील भायखळा येथे मोठ्या प्रमाणात दुकानदारांनी नियमांचे पालन केले नसल्याचे स्पष्ट झाले.