Join us  

जीम ट्रेनरने व्यायाम करणाऱ्याच्या डोक्यात घातले लाकडी मुदगल; मुलुंड येथील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 10:08 AM

जीममध्ये व्यायाम करताना ट्रेनरकडे बघणाऱ्या तरुणाच्या डोक्यात ट्रेनरने लाकडी मुदगल घातल्याचा प्रकार मुलुंडमध्ये घडला आहे.

मुंबई : जीममध्ये व्यायाम करताना ट्रेनरकडे बघणाऱ्या तरुणाच्या डोक्यात ट्रेनरने लाकडी मुदगल घातल्याचा प्रकार मुलुंडमध्ये घडला आहे. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी नवघर पोलिसांनी बुधवारी ट्रेनर धरव नाकेर याला अटक केली आहे. 

दोन वर्षांपासून युगेश शिंदे (२०) मुलुंड पूर्वेकडील फिटनेस इंटेलीजन्स जीममध्ये व्यायामासाठी जातो. बुधवारी कॉलेजला सुट्टी असल्याने तो पहाटे ५ वाजता जीममध्ये गेला. तेथे व्यायाम सुरू असताना ५:३० च्या सुमारास ट्रेनर धरव नाकेर त्याच्याकडे बघत होते. आपण चुकीच्या पद्धतीने  व्यायाम करत असल्याने ट्रेनर नाकेर बघत असल्याचे समजून सुरुवातीला त्याने दुर्लक्ष केले. त्यानंतर ट्रेनर पुन्हा बघत असल्याने काही बोलायचे आहे का? असे त्याने नाकेर याला विचारले. तेव्हा नाकेर  याने काही बोलायचे नाही सांगितले. शिंदेने दुसऱ्या बेंचवर बसून व्यायाम सुरू केला. त्यानंतर ६:३० च्या सुमारास नाकेर आला व काही समजण्याच्या आतच त्याने शिंदेच्या डोक्यात मुगदल मारले. या हल्ल्यात शिंदे जखमी झाला आहे. त्याच्या  डोळ्याखालील भागात दोन फ्रॅक्चर झाले आहे. त्यावेळी अन्य सहकाऱ्यांनी त्याला अडवून मागे ढकलले. त्याच्या डोक्यातून रक्तप्रवाह सुरू झाल्याने त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. 

ट्रेनर नाकेर यास वाटले युगेश सारखा आपल्याकडे बघत आहे. त्या रागातून त्याने हल्ला चढविल्याची माहिती समोर येत आहे. 

१)  तरुणाच्या डोक्यात मुदगल घातल्याची माहिती नवघर पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. 

२) युगेश शिंदे याच्या तक्रारीवरून पोलिसांनी ट्रेनर धरव नाकेर याला अटक केली आहे.

३) पोलिसांनी नाकेरविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ कलम ११८ (२) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. अधिक तपास सुरू आहे. 

टॅग्स :मुंबईमुलुंडसोशल व्हायरलसोशल मीडिया