Join us  

ज्वेलर्समधील कामगाराची अशीही बनवाबनवी; ११ तोळ्यांचे सोन्याचे दागिने लांबवले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2024 9:55 AM

सोन्याच्या दागिन्यांच्या जागी कमी वजनाचे दागिने ठेऊन पाच लाख १५ हजार रुपयांचे दागिने लंपास केल्याचा प्रकार घाटकोपरमध्ये उघड झाला आहे.

मुंबई : सोने व्यापाराच्या विश्वासू कामगारानेच दुकानातील सोन्याच्या दागिन्यांच्या जागी कमी वजनाचे दागिने ठेऊन पाच लाख १५ हजार रुपयांचे दागिने लंपास केल्याचा प्रकार घाटकोपरमध्ये उघड झाला आहे. प्रकाश गुज्जर असे आरोपी कामगाराचे नाव असून, त्याने ११ तोळ्यांच्या दागिन्यांवर हात साफ केला आहे. याप्रकरणी संपत परमार (५१, रा. घाटकोपर) यांच्या तक्रारीवरून घाटकोपर पोलिसांनी गुज्जरवर गुन्हा दाखल केला आहे.

परमार यांचा सोने, चांदी खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. गुज्जर त्यांच्या दुकानात आठ महिन्यांपासून काम करत होता. त्याच्यावर विश्वास बसल्याने परमार हे बाहेर जाताना त्याच्यावर दुकान सोपवून जात होते. त्याचा गैरफायदा घेत गुज्जर याने २२ जूनला दुकानातील ३१.३५० ग्रॅम वजनाच्या सोनसाखळीच्या जागी २.३१० ग्रॅमची सोनसाखळी ठेवली.

गुज्जर याने अशाप्रकारे दुकानात प्रदर्शनासाठी ठेवलेल्या दागिन्यांपैकी ३५ ग्रॅमच्या सोन्याच्या मंगळसूत्राच्या जागी तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी मंगळसूत्र ठेवले. २० ग्रॅमच्या दोन सोन्याच्या अंगठ्यांच्या बदल्यात ०.५ ग्रॅमच्या दोन अंगठ्या, मंगळसूत्राच्या ११ ग्रॅमच्या पेन्डलच्या बदल्यात ४०० मिलीचे छोटे पेन्डल, ८.८५० ग्रॅमच्या कानातील सोन्याच्या झुमक्यांच्या बदल्यात १.१० मिली वजनाचे दुसरे कानातले झुमके, ४.९२० ग्रॅमच्या कानातील टॉप्सच्या बदल्यात २.८० मिली वजनाचे कानातील टॉप्स ठेवले.

११ तोळ्यांचे सोन्याचे दागिने लांबवले-

परमार हे दर तीन महिन्यांनी दुकानातील दागिन्यांचा स्टॉक तपासत असताना गुज्जर याने केलेल्या दागिन्यांच्या अदलाबदलीचा प्रकार उघडकीस आला. ७ जुलैपासून गुज्जर कामावर न आल्याने त्यांचा संशय बळावला. परमार यांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता गुज्जरचा प्रताप उघडकीस आला. चौकशीत त्याने अशाच प्रकारे ११ तोळे दागिन्यांवर हात साफ करत पाच लाख १५ हजारांची फसवणूक केल्याचे समोर आले.

टॅग्स :मुंबईचोरीगुन्हेगारीपोलिस