मुंबई : वेसावे येथे अनधिकृत इमारती उभारून लहान टाउनशीपच विकसित केली जात होती की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याप्रकरणी मुंबई महापालिकेच्या दुय्यम अभियंत्याला निलंबित करण्यात आले आहे. असे असले तरी अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याबाबत वरिष्ठांनी वारंवार सूचना करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्याचे तसेच आयुक्तांच्या बैठकीला अनुपस्थित राहण्याचे धाडस या अधिकाऱ्याकडे आले कुठून? यामागे कुणाचा राजकीय वरदहस्त आहे का? वेसावे येथे अनधिकृत बांधकामांचे पेव फुटण्यास कोण जबाबदार? असे प्रश्न ऐरणीवर आले आहेत.
वेसावे येथील दोन ते तीन मजल्यांच्या तीन अनधिकृत इमारतींवर मंगळवारी पालिकेने कारवाई केली. त्यापाठोपाठ बुधवारी आणखी एक तीन मजली इमारत जमीनदोस्त करण्यात आली. वेसावे येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाईसाठी पालिकेने विशेष पथकाची स्थापना केली आहे.
अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निलंबित दुय्यम अभियंता सोमेश शिंदे यांना अनेकदा सूचना केल्या केल्या होत्या. मात्र, त्यांनी याकडे बिनधास्तपणे दुर्लक्ष केले होते. अन्य अधिकारी कारवाई करत असताना शिंदे वातानुकूलित गाडीत बसून होते, असाही ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी या भागातील अनधिकृत बांधकामांची दखल घेत बैठक बोलावली होती. या बैठकीस शिंदे अनुपस्थित राहिले होते. त्यांच्या धाडसामुळे पालिकेचे वरिष्ठ अधिकारीही अचंबित झाले आहेत.
‘सीआरझेड’मध्ये उभी राहिली बांधकामे -
वेसावे येथे सागरी किनारा व्यवस्थापन क्षेत्रात (सीआरझेड) बांधकामे झाली आहेत. तेथे विशिष्ट अंतराच्या आत बांधकामे करता येत नाहीत. वेसावे गावात प्रामुख्याने ही बांधकामे झाली आहेत. सीआरझेड क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी नगररचना भूमापन क्रमांकानुसार, अक्षांश व रेखांशासह बांधकामाची आडव्या-उभ्या तपशिलासह यादी तयार करणे, यास प्राधान्य देण्यात आले आहे.