आई-बाबा मतदान करायचं हं... आई-बाबांना पत्र लिहून मतदान करण्यासाठी साद घालण्याचा विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम
By मनोहर कुंभेजकर | Published: April 6, 2024 05:50 PM2024-04-06T17:50:48+5:302024-04-06T17:51:32+5:30
मुंबई उपनगर जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने विविध ठिकाणी जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहे.
मनोहर कुंभेजकर, मुंबई : लोकशाही प्रक्रियेत प्रत्येकाचे मत महत्त्वाचे असते. लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून जगातील या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या उत्सवासाठी आपल्या पालकांनीही सहभाग नोंदवावा अशी चिमुकल्यांची अपेक्षा! हीच अपेक्षा वर्सोवा येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी आई-बाबांना पत्र लिहून व्यक्त केली. 'आई - बाबा मतदान नक्की करायचं हं..' अशी आवाहन करणारी पत्रेच या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना लिहिली.
मुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदारांनी मताधिकार बजावावा यासाठी मुंबई उपनगर जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने विविध ठिकाणी जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीपचे नोडल अधिकारी डॉ. सुभाष दळवी यांच्या समन्वयाने मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात मतदार जनजागृती विषयक विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तुमचे एक मत देशासाठी ठरणार बहुमत यासाठी स्वीपच्या माध्यमातून जिल्ह्यात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचा एक भाग म्हणून आज वर्सोवा येथील यूपीस या इंग्रजी माध्यम शाळेत हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
देशाच्या सर्वांगीण विकासात भावी पिढीचे योगदान अमूल्य असणार आहे. जर विद्यार्थ्यांना शालेय जीवनात मतदानाचे महत्व पटवून दिले तर देशात एक सक्षम लोकशाही उभी राहण्यास नक्कीच मदत होणार आहे. ही बाब विचारात घेवून कामा रोड येथील इंग्रजी माध्यम शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना पत्रलेखनातून मतदान करण्यासाठी आग्रह केला आहे. या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे मतदानाची टक्केवारी उंचावण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे असा विश्वास डॉ. सुभाष दळवी यांनी व्यक्त केला.
आपले नावं मतदार यादीत आहे का?
मतदान जनजागृती अभियानातून मतदारांना मतदानाचा हक्क बाजवता यावा यासाठी आपले नावं मतदार यादीत तपासून घ्यावे, आणि आपले नाव नसेल तर मतदार नोंदणी करण्यासाठी voters.eci.gov.in/ voter Helpline Mobile App वर आणि मतदार मदत क्रमांक 1800221950 यावर संपर्क करावा, असे आवाहन देखील जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या वतीने यावेळी करण्यात आले.