‘कोळी आमची आदिवासी जमात’, संविधानिक हक्कांसाठी आझाद मैदानात महाआंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 09:48 AM2024-02-16T09:48:00+5:302024-02-16T09:50:43+5:30
आझाद मैदानात मोठ्या संख्येने आदिवासी कोळी महिला, पुरुष मुंबईत आले आहेत.
मुंबई : आदिवासी जमातींना संपूर्ण महाराष्ट्रासाठी अनुसूचित जमातीमध्ये वर्गीकृत केलेले असताना राज्य शासन उघडपणे अनास्था दाखवत असल्याने त्यांना इतर लाभ मिळत नाही, असा आरोप करीत आदिवासी कोळी जमातींच्या संविधानिक हक्कांसाठी राज्यस्तरीय महाआंदोलन समितीतर्फे आझाद मैदानात गुरुवारी राज्यव्यापी महाआंदोलन करण्यात आले. यासाठी मोठ्या संख्येने आदिवासी कोळी महिला, पुरुष मुंबईत आले आहेत.
राज्यस्तरीय समितीचे अध्यक्ष जगन्नाथ बाविस्कर, दादासाहेब बिऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली कोळी, महादेव कोळी, कोळी मल्हार, कोळी ढोर, टोकरे जमातींचे बांधव २३ जानेवारीपासून आंदोलन करीत आहेत. या जमातींपैकी एका जमातीचे कोणीही नसल्यामुळे तो ज्या जमातीचा दावा करत असेल त्या अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र त्याला मिळावे, रहिवासी पुराव्याव्यतिरिक्त अनु.जमातींची नोंदी वैधतेबाबतचा पुरावा मागू नये, अशी आंदाेलकांची मागणी आहे.
आठ दिवसांत प्रमाणपत्रे द्या :
७ मार्च १९९६ चा शासन निर्णय व नियम २००१ नुसार कागदपत्रे, दस्तऐवज, पुरावे मागू नये, सर्व प्रलंबित अर्जाचा सकारात्मक विचार करून आठ दिवसांत महाराजस्व अभियानांतर्गत प्रमाणपत्रे द्यावीत, यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू असून याकडे शासनाचे लक्ष वेधले जात आहे.
मैदान दणाणले :
आझाद मैदानात आंदोलन सुरू झाल्यापासून सरकारने अद्यापही दखल घेतलेली नाही. त्यामुळे गुरुवारी मोठ्या संख्येने आलेल्या आदिवासी कोळी बांधवांनी जोरदार घोषणाबाजी करत आझाद मैदान दणाणून सोडले.