लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई महापालिकेतील लिपिक भरतीसाठी उमेदवार दहावी आणि पदवी परीक्षा ‘’पहिल्याच प्रयत्नात’’ उत्तीर्ण झालेला आवश्यक ही अट रद्द करण्यात आली आहे. ही अट रद्द करण्याची मागणी विविध स्तरांवरून करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनानेते आदित्य ठाकरे यांनी अट रद्द करण्याची सूचना केली होती.
सर्वांनी केलेल्या सूचनांचा विचार केल्यानंतर ‘प्रथम प्रयत्नात’ उत्तीर्ण ही अट रद्द करण्याचा सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. त्यामुळे आता नव्याने जाहिरात प्रसिद्ध करू येत्या १५ दिवसांत भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. तसे निर्देश आयुक्त भूषण गगराणी यांनी सामान्य प्रशासन विभागाला दिले आहेत. त्याचबरोबर, या शैक्षणिक पात्रतेत आवश्यक ती सुधारणा करण्याची प्रशासकीय कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. लाखो उमेदवारांना दिलासा-
यापूर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांनी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही. त्यांचे अर्ज पुढील भरती प्रक्रियेत ग्राह्य धरले जाणार आहेत. प्रशासनाच्या या निर्णयामुळे लाखो उमेदवारांना दिलासा मिळाला असून, त्यांना या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
आधी अर्ज केला? निर्धास्त राहा-
१) पालिकेत लिपिक संवर्गातील १,८४६ जागा सरळसेवेने भरण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. या जागांसाठी अर्हताप्राप्त उमेदवारांकडून २० ऑगस्टपासून ऑनलाइन अर्ज मागविण्यास प्रारंभ करण्यात आला होता. ९ सप्टेंबर ही अर्ज करण्याची अंतिम तारीख होती.
२) अर्ज केलेल्या उमेदवारांनी शंका बाळगण्याची आवश्यकता नाही. भरती प्रक्रिया नव्याने सुरू होणार असली तरी आधी अर्ज केलेल्या उमेदवारांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. त्यांचे अर्ज पद भरतीच्या नव्या प्रक्रियेमध्ये ग्राह्य धरले जातील, असेही प्रशासनाने कळविले आहे.