लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई महानगरपालिकेने एमएमआरडीएकडून ताब्यात घेतलेल्या पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गांच्या सर्व्हिस रोडची मोठी दुरुस्ती लवकरच करण्यात येणार असून, यासाठी पालिकेने तब्बल तब्बल १ कोटी १४ लाख रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान, मुंबईतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यासाठी लागणाऱ्या ६ कोटी रुपये खर्चाच्या तुलनेत या रस्त्यांसाठी होणारा खर्च जवळपास २५ टक्के असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
तीन वर्षांत खड्डे बुजविण्यासह दोन्ही एक्स्रेसवेवरील पुलांजवळील जंक्शन व स्लिप रोडची दुरुस्तीही होणार आहे. सर्व्हिस रोडसह दोन्ही महामार्गांच्या डागडुजीसाठी दहा वर्षांत पंधराशे कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचे स्पष्ट करण्यात येत आहे.
दोन्ही द्रूतगती महामार्गांची झालीय दूरवस्था-
पालिकेच्या अखत्यारीतील सुमारे दोन हजार किमी लांबीच्या रस्त्यांवर पावसाळ्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात खड्डे पडत असल्याने पालिका प्रशासनाला मोठ्या टीकेचा सामना करावा लागतो.त्यामुळे पालिका सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे धोरण राबवत आहे. आता २०२२ मध्ये पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्ग एमएमआरडीएकडून पालिकेच्या ताब्यात देण्यात आले.
त्यांचीही प्रचंड दुरवस्था झालेली असल्याने सीसी रोड्सच्या पार्श्वभूमीवर या महामार्गाच्या सर्व्हिस रोडसाठी ही निविदा काढण्यात आली आहे.
पोहोच रस्ते आणि सर्व्हिस रोडवर लक्ष-
१) या दोन्ही महामार्गाच्या पावसाळा पूर्व डागडुजीसाठी यंदाच्या मे महिन्यात १७६ कोटींची निविदा प्रक्रिया पालिकेकडून राबविण्यात आली होती.
२) त्यामुळे आताची निविदा प्रक्रिया ही प्रामुख्याने या महामार्गांना जोडणाऱ्या पोहोच रस्त्यांच्या आणि सर्व्हिस रोड्सच्या डागडुजीसाठीच आहे.
३) या कामानंतर कंत्राटदारावर या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी दहा वर्षे राहणार असल्याची माहिती पालिकेच्या रस्ते विभागाकडून देण्यात आली.