Join us  

'मेट्रो १' मार्गिकेवरून १०० कोटी लोकांचा मेट्रो प्रवास; कार्यालयीन वेळेत प्रवाशांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 11:06 AM

पूर्व-पश्चिम उपनगरांना जोडणारी वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर ही मुंबई मेट्रो १ मार्गिका १० वर्षांपूर्वी प्रवाशांच्या सेवेत रुजू झाली.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पूर्व-पश्चिम उपनगरांना जोडणारी वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर ही मुंबईमेट्रो १ मार्गिका १० वर्षांपूर्वी प्रवाशांच्या सेवेत रुजू झाली. या मेट्रो मार्गिकेला प्रवशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत १०० कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे. 

मुंबईतील ही पहिली मेट्रो मार्गिका असून, ती ८ जून २०१४ मध्ये प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली. तेव्हापासून २० ऑगस्ट २०२४ या १० वर्षे दोन महिन्यांत (३,७१७ दिवसांत) १०० कोटी प्रवाशांचा टप्पा पार करत नवा उच्चांक गाठला. सद्य:स्थितीत या मेट्रो मार्गिकेवरून दररोज पाच लाख प्रवासी प्रवास करीत आहेत. 

या मेट्रो मार्गिकेवरून २०२१ मध्ये मेट्रोतून सहा लाख ५० हजार प्रवासी प्रवास करतील, असे अपेक्षित होते. मात्र, अद्याप ही प्रवासी संख्या वाढली नसल्याची स्थिती आहे. तरीही देशातील सर्वाधिक प्रवासी संख्या लाभलेल्या मेट्रो मार्गिकांपैकी ही मेट्रो आहे. 

मेट्रो १ मार्गिकेवरील गाड्या चार डब्यांच्या आहेत. मात्र, आता या मार्गिकेवरील प्रवासी संख्या वाढली आहे. गर्दीच्या वेळी मेट्रो गाडी भरून धावताना दिसते तसेच स्थानकांवरही मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याचे चित्र असते. परिणामी, अधिक प्रवासी वाहतुकीसाठी ही मेट्रो गाडी सहा डब्यांची करण्याची गरज व्यक्त होत आहे. 

दररोज पाच लाख प्रवासी-

मेट्रो १ मार्गिकेवरून दररोज पाच लाख प्रवासी प्रवास करीत आहेत. या महिन्यातच १३ ऑगस्टला या मेट्रो मार्गिकेने पाच लाख प्रवाशांचा टप्पा पार करीत नवा उच्चांक गाठला आहे. 

४३० फेऱ्यांद्वारे सेवा-

मेट्रो १ मार्गिकेवर दरदिवशी ४३० फेऱ्या होत आहेत. त्यातून गर्दीच्या वेळी ही गाडी दर तीन मिनिटांनी मार्गावर धावत आहे. तर, अन्य वेळेत दर सात मिनिटांनी गाडी धावत आहे.

टॅग्स :मुंबईअंधेरीवर्सोवाघाटकोपरमेट्रो