लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांसाठी नियमित विद्यार्थ्यांची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया १६ ऑगस्टपासून सुरू झाली आहे, अशी माहिती राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली. ही प्रक्रिया २६ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. मुंबईत प्रतीक्षा यादीतील एक हजार २९३ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे.
यंदा आरटीई प्रवेशासाठी दोन लाख ४२ हजार ५१६ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले होते. त्यापैकी ९३ हजार ०३२ विद्यार्थ्यांची निवड झाली. नियमित फेरीतून त्यापैकी ६१ हजार १५६ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ८ ऑगस्टला पूर्ण झाली होती. या प्रवेश प्रक्रियेसाठी दोनवेळा मुदतवाढही देण्यात आली होती. याच दरम्यान ७२ हजार २७६ विद्यार्थ्यांची नावे प्रतीक्षा यादीत होती.
प्रवेशासाठी लिंक-
प्रवेशाची लिंक १६ ते २६ ऑगस्टदरम्यान खुली राहील. या विद्यार्थ्यांना https://student.maharashtra. gov.in/adm_portal/Users/ rte index new या लिंकवर प्रक्रिया पूर्ण करायची आहे.
निवासी पुरावा ठरणार महत्त्वाचा-
निवासाचे खोटे पुरावे सादर करून मोफत प्रवेश घेणाऱ्या पालकांचा बनाव लक्षात आल्यानंतर प्रशासनाने आता निवासी पुरावा दाखविण्याबाबत कडक भूमिका घेतली आहे. आपण ज्या ठिकाणी वास्तव्यास आहोत, त्या ठिकाणी असलेले रहिवासी पुरावे जोडावेत. रहिवास पुराव्यामध्ये आधार कार्ड, बँकेचे पासबुक, गॅस पुस्तक, भाड्याने राहत असाल तर भाडेपट्टा करार सादर करणे आवश्यक आहे.
प्रवेशासाठी ही कागदपत्रे आवश्यक-
१) शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी पालकांनी रेशन कार्ड, ड्रायव्हिंग परवाना, वीज किंवा टेलिफोन बिल, प्रॉपर्टी टॅक्स देयक किंवा घरपट्टी, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक, भाडे करार म्हणून दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी केल्याची प्रत आवश्यक आहे.
२) जन्मतारखेचा पुरावा, उत्पन्नाचा पुरावा म्हणून पगाराची स्लीप, तहसीलदारांचा दाखला, कंपनीचा दाखला, जात प्रमाणपत्र पुरावा, दिव्यांग मुलांसाठी जिल्हा शल्य चिकित्सक किंवा वैद्यकीय अधीक्षक यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक आहे.