लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई महापालिकेने शहर भागातील दोन्ही टप्प्यांतील रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामांना परवानगी दिली आहे. त्यामुळे आता पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मिळून १३५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण हे १ ऑक्टोबरपासून हाती घेतले जाणार आहे.
पालिकेच्या अखत्यारीतील एकूण दोन हजार ५० किलोमीटर रस्त्यांपैकी ४५० किलोमीटरचे रस्ते हे शहरी भागातील आहेत. या विभागातील २५५ किलोमीटर रस्त्यांचे काँक्रिटीकरण केल्याचा पालिकेने दावा केला आहे. त्यामुळे आता ५३ टक्के रस्ते हे डांबरी किंवा पेव्हर ब्लॉकचे आहेत. या रस्त्यांचेही काँक्रिटीकरण होणार आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यात ७१ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी निविदा मागवण्यात आल्यानंतर कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली. याआधीचे कंत्राट हे वादग्रस्त ठरले होते.
पहिल्या टप्प्यासाठी १,९३८ कोटी रुपये-
१) २०८ रस्त्यांची सुधारणा आणि मजबुतीकरण, २७ रस्त्यांवरील जुन्या तुटलेल्या पॅनल्सच्या दुरुस्तीची कामे पहिल्या टप्प्यात केली जाणार आहेत.
२) या कामासाठी एनसीसी लिमिटेड कंपनी पात्र ठरली आहे. कंपनीने पालिकेच्या अंदाजपत्रकानुसार ९.९० टक्के अधिक दर आकारला होता.
३) प्रशासन व कंपनीतील वाटाघाटीनंतर हा दर ४ टक्क्यांवर आला. आता ९.९० ऐवजी ४ टक्के दरांत काम करण्यास कंपनीने होकार दिला.
पालिकेने त्यामुळे कंत्राट मंजूर केले. पहिल्या टप्प्यातील रस्त्यांच्या कामांसाठी १,९३८ कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
दुसऱ्या टप्प्यासाठी १,६२४.६८ कोटी-
१) दुसऱ्या टप्प्यात ६५.०६ कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरणासाठी निविदा मागवल्या आहेत.
२) या टप्प्यात २९५ रस्त्यांची कामे होणार आहेत. या कामासाठी जीएचव्ही प्रा. लि. ही कंपनी पात्र ठरली आहे.
३) याही कामामध्ये कंत्राटदाराने पालिकेच्या अंदाजित दरापेक्षा ९.०१ टक्के अधिक बोली लावली होती. अखेर वाटाघाटी होऊन पाच टक्के दर कमी करण्यात आला.
४) या टप्प्यातील कामांसाठी १६२४.६८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.