मुंबई :मध्य रेल्वेच्यामुंबई विभागाने जून-२०२४ मध्ये १.९५ दशलक्ष टन मालवाहतूक केली आहे. गेल्या १५ वर्षांतील जून महिन्यातील ही सर्वोत्तम कामगिरी असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मुंबई विभागाने जूनमध्ये १.९५ दशलक्ष टन मालवाहतूक नोंदवली असून, मागील वर्षीच्या याच महिन्यातील १.७१ दशलक्ष टन लोडिंगच्या तुलनेत १४.०३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत लोडिंग ५.४३ दशलक्ष टन आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीतील ५.१५ दशलक्ष टनच्या तुलनेत लोडिंग ५.४४ टक्क्यांनी वाढले आहे. जून २०२३ मधील ९० हजार टन लोडिंगच्या तुलनेत जून २०२४ मध्ये २.३० लाख टनांच्या आकडेवारीसह कोळशाचे लोडिंग १५० टक्क्यांनी वाढले आहे. एप्रिल ते जून २०२४ या कालावधीत ७.२० लाख टन कोळसा लोडिंग झाला आहे.
२३५ कोटींपर्यंत महसूल-
१) मागील वर्षी कोळसा लोडिंग दोन लाख टन होते आणि त्यात २६८ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.
२) मुंबई विभागात, एप्रिल ते जून या कालावधीत दररोज सरासरी १११ गाड्या चालवण्यात आल्या. तर, यंदा जून महिन्यात दररोज सरासरी ११३.६ मालवाहतूक गाड्या चालवण्यात आल्या.
३) मागील वर्षी जूनपर्यंत २०३.९३ कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते. यंदा जूनमध्ये मालवाहतुकीतून मिळविलेला महसूल १५.२४ टक्क्यांनी वाढून २३५.०१ कोटी रुपये झाला आहे, असे मध्य रेल्वे मुंबई विभागाने सांगितले आहे.