Join us

डोळ्यांत मिरचीपूड टाकून १.७० लाख लुटले; मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 11:15 AM

डोळ्यांत मिरची पूड टाकून एक लाख ७० हजार रुपयांची रोकड लुटल्याची घटना मुलुंडमध्ये घडली आहे.

मुंबई : एका कार शोरूममधील लेखापाल दुचाकीवरून घरी निघाले असताना त्यांच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून एक लाख ७० हजार रुपयांची रोकड लुटल्याची घटना मुलुंडमध्ये घडली आहे. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.

मुलुंड परिसरात राहणारे  ललित पंजाबी (५८) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पंजाबी हे शोरूममधील दिवसभरात जमा झालेली रोकड दररोज घरी नेतात आणि ती दुसऱ्या दिवशी बँकेमध्ये भरतात. २० जुलैला ते सायंकाळी ७ वाजता शोरूममधील एक लाख ६० हजार रुपयांची रक्कम घेऊन दुचाकीने घरी निघाले. त्यावेळी ७:१५ च्या सुमारास गोरेगाव लिंक रोड येथील पाइप लाइन पुलाच्या वर एका दुकलीने त्यांना गाडी थांबविण्याचा इशारा केला. पंजाबी यांनी गाडी थांबवताच दुकलीने त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली. ते खाली पडताच त्यांच्याकडील बॅग हिसकावून त्यांनी भांडुपच्या दिशेने पळ काढला. 

स्वत:च दिली माहिती-

१) या घटनेत शोरूमचे एक लाख ६० हजार आणि पंजाबी यांचे वैयक्तिक १० हजार असे एकूण एक लाख ७० हजार रुपये चोरट्यांनी लांबविले. या घटनेची माहिती त्यांनी तत्काळ पोलिस नियंत्रण कक्षात दिली.

२) त्यानंतर तेथून त्यांनी भांडुप पोलिस ठाणे गाठले. मात्र घटनास्थळ मुलुंड पोलिसांच्या हद्दीत असल्याने त्यांना तेथे पाठवले. मुलुंड पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीपोलिस