Join us

फ्लॅट खरेदीत १७.६८ कोटीची फसवणूक; गोरेगाव पोलिसात गुन्हा दाखल 

By गौरी टेंबकर | Published: June 08, 2024 5:07 PM

गोरेगावच्या सिद्धार्थनगर मधील निर्माणधीन इमारतीच्या प्रोजेक्टमध्ये फ्लॅट खरेदीवर गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करत १७.६८ कोटींची फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

गौरी टेंबकर, मुंबई:गोरेगावच्या सिद्धार्थनगर मधील निर्माणधीन इमारतीच्या प्रोजेक्टमध्ये फ्लॅट खरेदीवर गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करत १७.६८ कोटींची फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यात सहा जणांनी पैसे भरले होते ज्यांना अकरा वर्षानंतरही फ्लॅटचा ताबा देण्यात आला नाही. तसेच त्यांचे पैसेही परत केले नसून या विरोधात गोरेगावपोलिसांनी चार विकासकांसह सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. 

पराग मुनोत, मोफतराज मुनोत, अनुज मुनोत, इस्माईल कांगा, देवेश भट, नरेंद्र लोंढा आणि ओमप्रकाश मेहता अशी या सात जणांची नावे आहेत. तक्रारदार ईश्‍वरलाल वंजारा (६१) हे कांदिवलीतील अशोकनगर परिसरात राहतात. त्यांना एप्रिल २०१३ रोजी गोरेगावच्या कल्पतरु रेडियन्स या इमारतीचे बांधकाम सुरु असून तिथे आताच फ्लॅट बुक केल्यास त्यांना फायदा होईल असे एका एजंटने सांगितले. त्यानुसार त्यांनी विकासक आणि प्रमोटर पराग, मोफतराज, अनुज मुनोत, त्यांचे पार्टनर इस्माईल कांगा यांची भेट घेतली. सदर प्रोजेक्टचे इंचार्ज देवेश भट तर संचालक नरेंद्र लोढा होते. ज्यांनी वंजारा यांना त्यांच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला.  तसेच २०१७ साली इमारतीचे बांधकाम पूर्ण करुन फ्लॅटचा ताबा देऊ असेही सांगितले. त्यामुळे त्यांनी तिथे टू बीएचके फ्लॅट सुमारे सव्वादोन कोटी रुपयांमध्ये बुक करत कंपनीच्या बँक खात्यात टप्याटप्याने दोन कोटी नऊ लाख रुपये ट्रान्स्फर केले. पेमेंटनंतर त्यांना नवव्या मजल्यावर फ्लॅट अलोट करण्यात आला होता.

त्या फ्लॅटचे रजिस्ट्रेशनही सुमारे अकरा लाखात करण्यात आले. मात्र २०१७ रोजी फ्लॅटचा ताबा मिळाला नाही. त्यांनी याबाबत विचारणा केल्यावर टाळण्याचा प्रयत्न होऊ लागला. अशाच प्रकारे चेतन नेगांधी, जयेश चौधरी, राकेश शहा, जितेंद्र जैन आणि विशाल बंधे यांचीही फसवणूक करण्यात आली. त्यानुसार त्यांच्या तक्रारीनंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीपोलिसगोरेगाव