मनी लॉड्रिंगमध्ये भीती दाखवून २ कोटी रुपये लंपास; ज्येष्ठ नागरिकाची भामट्यांकडून फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 10:33 AM2024-07-04T10:33:38+5:302024-07-04T10:35:25+5:30
मनी लाँड्रिंग प्रकरणात बँक खात्याचा वापर झाल्याचे सांगून एका ७६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचे बँक खाते रिकामे केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मुंबई : जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात बँक खात्याचा वापर झाल्याचे सांगून एका ७६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचे बँक खाते रिकामे केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये आजोबांची दोन कोटी १८ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी दक्षिण सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला आहे.
फसवणूक झालेल्या तक्रारदारांना ११ एप्रिलला व्हॉट्सॲपवर कॉल आला. पलीकडील व्यक्तीने वांद्रे गुन्हे शाखेतून संदीप राव बोलत असल्याची बतावणी करून तुमच्या आधार कार्डवरून कोणीतरी सीमकार्ड घेतले असून, तुमचे आधार कार्ड पाठवा, असे सांगितले. आधार कार्ड पाठवताच भामट्याने काही कागदपत्रे तक्रारदारांना पाठवली. त्यात, नरेश गोयल विरुद्ध दाखल मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात त्यांच्याही खात्याचा सहभाग असल्याचा उल्लेख होता.
बँक खात्याची घेतली माहिती-
१) सुप्रीम कोर्टाच्या एका कागदपत्रातही त्यांचे नाव आढळले. भामट्याने हे नॅशनल सिक्रेट असल्याचे सांगून याबाबत कुणाकडेही वाच्यता करू नये, असे तक्रारदाराला बजावले.
२) १२ एप्रिल रोजी तक्रारदाराला पुन्हा कॉल आला आणि कागदपत्रांसह तयार राहण्यास सांगितले.
३) सीबीआय अधिकारी आकाश कल्हारी पुढील तपास करणार असल्याचे सांगून त्यांचा कथित क्रमांक शेअर करण्यात आला.
४) तक्रारदाराने संबंधित क्रमांकावर संपर्क साधताच, तुमची सर्व बँक खाती तपासावी लागतील असे सांगून, भामट्याने बँक खात्यांची माहिती घेण्यास सुरुवात केली.
पैसे ट्रान्सफर करण्यासाठी दबाव-
चौकशीदरम्यान भामट्याने खात्यातील सर्व रक्कम सांगितलेल्या बँक खात्यात ट्रान्सफर केली. १२ एप्रिल ते २० एप्रिल दरम्यान तपास यंत्रणांची नावे घेऊन दोन कोटी १८ लाख रुपये ट्रान्सफर करण्यास तक्रारदाराला भाग पाडण्यात आले.
सरकारी यंत्रणांच्या नावाचा वापर -
या गुन्ह्यात भामट्यांनी मुंबई गुन्हे शाखा, आरबीआय, सुप्रीम कोर्ट, आयकर, ईडी अशा यंत्रणांच्या नावांचा वापर केला. बनावट पत्र पाठवून नरेश गोयल गुन्ह्याशी संबंध असल्याचे तक्रारदाराला भासवण्यात आले. अखेर, काही दिवसांनी तक्रारदाराने जवळच्या व्यक्तीला याबाबत माहिती दिली. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांत गेले. दक्षिण सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.