Join us

नालेसफाईत २८० कोटींची ‘सफाई’: रवी राजा ; वडाळा परिसरातील नाले अजूनही तुंबलेलेच

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 11:47 AM

मुंबई महापालिकेच्या नालेसफाईच्या दाव्यावर पालिकेतील काँग्रेसचे माजी गटनेते रवी राजा यांनी निशाणा साधला आहे.

मुंबई :मुंबई महापालिकेच्या नालेसफाईच्या दाव्यावर पालिकेतील काँग्रेसचे माजी गटनेते रवी राजा यांनी निशाणा साधला आहे. नालेसफाईची कामे अपूर्ण असून यंदा नालेसफाईच्या नावाखाली २८० कोटी रुपयांची ‘सफाई’ झाल्याचा आरोप त्यांनी केला.  

वडाळा ट्रक टर्मिनस नाला, इंद्रानगर नाला आदी ठिकाणच्या नालेसफाईच्या कामाची पाहणी रवी राजा यांनी गुरुवारी केली. म्हाडा न्यू ट्रान्झिट कॅम्प येथील कोकरे नाल्याची सफाई कागदावरच असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. नालेसफाईच्या कामाला १६ मार्चपासून सुरुवात झाली असून, या कामासाठी यंदा २८० कोटी रुपये पालिकेकडून खर्च करण्यात येत आहेत. नालेसफाईचे काम वेगाने सुरू असून नाल्यांतील १०० टक्के गाळ उपसल्याचे पालिकेच्या डॅशबोर्डवर दर्शवले जात होते. मात्र, तीन महिने उलटले तरी नालेसफाई पूर्णपणे झालेली नाही. त्यामुळे पावसाळ्यात मुंबईची तुंबई होणार आहे, असे राजा म्हणाले. 

आरोग्याला धोका-

म्हाडा न्यू ट्रान्झिट कॅम्प येथे २५ वर्षांपासून मातीचा रस्ता असून संपूर्ण परिसरात कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत असल्याने रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. संबंधित प्रशासन व नेते मंडळींनी जातीने लक्ष घालत येथील प्रश्न सोडवावा, अशी मागणी यावेळी स्थानिकांनी केली.

बालवाडी बंद-

म्हाडा न्यू ट्रान्झिट कॅम्प येथे एक बालवाडी सुरू करण्यात आली आहे. मात्र पावसाळ्यात पाणी तुंबण्याची भीती असल्याने ही  बालवाडीच बंद करण्यात आली आहे. पावसाळ्यात शाळेत जाणाऱ्या मुलांनाही अडचणींचा सामना करावा लागतो, याकडेही स्थानिकांनी लक्ष वेधले. 

टॅग्स :मुंबईनगर पालिकाकाँग्रेसवडाळा