मुंबई : घाटकोपर पश्चिमेतील हनुमान टेकडी येथे दरड कोसळणाऱ्या ठिकाणी दरड प्रतिबंधक जाळ्या (जिओ नेटिंग) बसवण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. त्यापाठोपाठ आणखी कुठे अशा जाळ्या बसवता येतील, याची चाचपणीही पालिकेने सुरू केली आहे. दरम्यान, मुंबईत गेल्या ३० वर्षांत दरड कोसळल्यामुळे जवळपास २९० जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३०० जण जखमी झाले होते. दरडींचा धोका असणाऱ्या ठिकाणी सुमारे २२ हजारांपेक्षा अधिक रहिवासी जीव मुठीत धरून राहत आहेत. मात्र, आतापर्यंत त्यांच्या पुनर्वसनाची कोणतीही योजना आखण्यात आलेली नाही.
हनुमान टेकडी येथील जाळ्या बसविण्याच्या कामाची बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली होती. मुंबईत दरडी कोसळण्याची भीती असलेली ३१ ठिकाणे असून, तेथे शिंदे यांच्या सूचनेनुसार पालिकेने सर्वेक्षण सुरू केले आहे. मुंबईत घाटकोपर, विक्रोळी पार्कसाईट साकीनाका, भांडुप, कुर्ला, मालाड, चेंबूर, ग्रँटरोड आणि वरळी या भागांत मोठ्या प्रमाणावर डोंगरावर वस्त्या आहेत. त्यापैकी घाटकोपर, साकीनाका, विक्रोळी पार्कसाईट आणि भांडुप हे भाग सर्वाधिक धोकादायक आहेत.
या सर्व भागांतील २२ हजार ४८३ झोपड्यांपैकी नऊ हजार ६५७ कुटुंबांना प्राधान्याने स्थलांतरित करण्याची शिफारस काही वर्षांपूर्वी मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाने राज्य सरकारला केली होती. तर उर्वरित वस्त्यांच्या झोपड्यांना टेकड्यांच्या आजूबाजूला तटबंदी बनवून संरक्षित करण्याचे प्रस्तावित केले होते. २०११ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कृती आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यांच्या आदेशाचीही अंमलबजावणी सरकारी यंत्रणेला करता आली नव्हती.
२०११ मध्ये १८ जण दगावले-
२०२१ मध्ये साकीनाका येथे दरड कोसळून १८ जणांचा मृत्यू झाला होता. याच वर्षात चेंबूरमधील वाशीनाका येथीही मोठी दुर्घटना घडली होती. २०२१ मध्ये मालाडच्या कुरार नगर येथील सुमारे १०० कुटुंबांनी दरड कोसळण्याच्या भीतीने जवळच्या शाळेत आश्रय घेतला होता.