दरवर्षी ३ लाख लोकांच्या भेटी; परदेशी पाहुण्यांचीही पसंती; मणिभवन ठरतेय पर्यटकांचे आकर्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 12:17 PM2024-08-19T12:17:21+5:302024-08-19T12:19:12+5:30
महात्मा गांधींचे मुंबईतील वास्तव्याचे मुख्य स्थान म्हणजे गावदेवीच्या लॅबर्नम रोडवरील मणिभवन.
अमर शैला, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : महात्मा गांधींचे मुंबईतील वास्तव्याचे मुख्य स्थान म्हणजे गावदेवीच्या लॅबर्नम रोडवरील मणिभवन. स्वातंत्र्योत्तर काळात गांधीजींच्या स्मृती जागवणाऱ्या या स्थानाचे एखाद्या स्मारकाप्रमाणे जतन करण्यात आले आहे. त्यामुळेच मुंबईत येणाऱ्या परदेशी पाहुण्यांसह जवळपास ३ लाख पर्यटक दरवर्षी मणिभवनला भेट देतात.
महात्मा गांधी यांनी १९१७ ते १९३४ या काळात मणिभवन येथे वास्तव्य केले. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात ते मुंबईत आले की मणिभवनातच राहत. रोलेट ॲक्ट विरुद्धचा १९१९ चा सत्याग्रह, तसेच ‘इंडियन प्रेस ॲक्ट’च्या विरोधातील ‘सत्याग्रही’ पत्रिकेचे प्रकाशन गांधीजींनी येथूनच सुरू केले. ‘यंग इंडिया’, ‘नवजीवन’ साप्ताहिकाची जबाबदारी गांधीजींनी येथे स्वीकारली.
या वास्तूला भेट देणारा परदेशी पाहुणा आपल्या देशात गेल्यावर तेथील लोकांना मणिभवनला भेट देण्यासाठी प्रेरणा देतो. ऑक्टोबर ते एप्रिल या काळात दरदिवशी ५०० हून अधिक परदेशी पर्यटक भेट देतात. - मेघश्याम आजगावकर, सचिव, मणिभवन गांधी संग्रहालय
ग्रंथ, प्रदर्शन व बरेच काही...
मणिभवनातील हॉलमध्ये प्रार्थनेला बसलेली गांधीजींची कांस्यमूर्ती आहे. तसेच वाचनालयात गांधी विचारांवरील सुमारे ५० हजार संदर्भ ग्रंथ असून ते वाचक आणि संशोधकांसाठी उपलब्ध आहेत. मणिभवनातील दुसऱ्या माळ्यावर गांधीजींच्या बैठकीची आणि कामकाजाची जागा असलेली खोली कोणताही बदल न करता जतन करण्यात आली आहे. गांधीजींच्या आयुष्यातील २८ महत्त्वाचे प्रसंग सुशीलाताई गोखले-पटेल यांनी बाहुल्यांच्या माध्यमातून साकारले आहेत. गांधींच्या वास्तव्यादरम्यानचे महत्त्वाचे फोटो आणि त्यांच्या आयुष्यातील घडामोडींवर आधारलेले प्रदर्शनही येथे एका खोलीत मांडण्यात आले आहे.