Join us

सर्व्हर डाऊनचा विद्यार्थ्यांना फटका, एमएचटी-सीईटी परीक्षा; बोरीवली येथील महाविद्यालयात प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 9:38 AM

बोरीवली पूर्वेतील एल. एन. महाविद्यालयातील आर. आर. इन्फोटेक या केंद्रावर सर्व्हर डाऊन झाल्यामुळे ३०० विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप झाला.

मुंबई : इंजिनिअरिंग आणि फार्मसी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटी परीक्षेवेळी शुक्रवारी बोरीवली पूर्वेतील एल. एन. महाविद्यालयातील आर. आर. इन्फोटेक या केंद्रावर सर्व्हर डाऊन झाल्यामुळे ३०० विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप झाला.

एमएचटी-सीईटी ही संगणकआधारित परीक्षा २२ एप्रिलपासून सुरू झाली आहे. राज्यातील विविध केंद्रांवर सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रांत ही परीक्षा घेतली जाते. शुक्रवार, १० मे रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ या सत्राकरिता विद्यार्थ्यांना सकाळी ७:३० वाजताच हजर राहण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार विद्यार्थी बोरीवली पूर्वेतील एल. एन. महाविद्यालयातील आर. आर. इन्फोटेक या केंद्रावर उपस्थित होते. सकाळी ९ वाजता परीक्षा सुरू होते न होते तोच संगणक बंद पडले. सर्व्हर डाउन झाल्याचे कारण देत परीक्षा वेळेत सुरूच करण्यात आली नाही. 

दुपारी १२:३० च्या सुमारास म्हणजे २ ते ५ च्या सत्राचे परीक्षार्थी येऊ लागले तरी सर्व्हरचा प्रश्न सुटला नव्हता. अखेर १ वाजता परीक्षा सुरू झाली. मात्र, तोपर्यंत सकाळी ७-७:३० वाजल्यापासून परीक्षा केंद्रावर खोळंबून असलेल्या विद्यार्थ्यांचा धीर सुटला होता. प्लास्टिकच्या खुर्चीवर त्यांना ८ वाजल्यापासून बसवून ठेवण्यात आले होते. त्यात अनेक मुले-मुली उपाशी होती. 

विद्यार्थी आणि परीक्षा केंद्राबाहेर जमलेल्या पालकांनी परीक्षा रद्द करून नवीन वेळापत्रकानुसार घेण्याची मागणी केली.  मात्र, त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. परीक्षा केंद्रावर अत्यंत गोंधळाचे वातावरण होते. आमच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत तणावाखाली ही परीक्षा दिल्याची तक्रार पालकांनी केली.

परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय-

पहिल्या सत्राची परीक्षा लांबल्याने दुपारच्या २ ते ५ या सत्राची परीक्षा वेळेवर सुरू होऊ शकली नाही. आता या विद्यार्थ्यांची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे ‘सीईटी सेल’ने जाहीर केले आहे.

टॅग्स :मुंबईबोरिवलीपरीक्षाविद्यार्थी