Join us

वर्षभरात ३७ कि.मी.चे मेट्रोमार्ग खुले होणार; ठाणे किनारी मार्ग २०२८ मध्ये पूर्णत्वास 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 9:31 AM

सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात आणखी ३७ कि.मी. अंतराचे मार्ग खुले केले जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना दिली.

मुंबई :मुंबईसह पुणे आणि नागपूर या शहरांमध्ये ४४९ किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग  उभारण्यास मान्यता देण्यात आली असून त्यापैकी १२७ कि.मी. अंतराचे मार्ग वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात आणखी ३७ कि.मी. अंतराचे मार्ग खुले केले जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना दिली. पायाभूत सुविधा आणि अन्य महत्त्वाच्या योजनांबाबत बोलताना पवार म्हणाले की, शिवडी-न्हावा शेवा प्रकल्पांतर्गत शिवडी ते वरळी या जोडमार्गाचे काम ५७ टक्के पूर्ण झाले आहे. डिसेंबर २०२५ अखेर या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. 

बाळकुम ते गायमुख दरम्यान उभारण्यात येणाऱ्या ठाणे किनारी मार्गाची लांबी १३.४५ कि.मी. आहे. त्यासाठी ३ हजार ३६४ कोटी रूपये किमतीचे हे काम मे २०२८ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे, असेही पवार म्हणाले. 

१) धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी मार्गाचे बहुतांश काम पूर्ण झाले असून दोन्ही मार्गिका अंशतः खुल्या करण्यात आल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.

२) वरळी येथील धर्मादाय आयुक्तांच्या मुख्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम व इतर ठिकाणच्या सध्याच्या इमारतींच्या नूतनीकरणासाठी १२५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची घोषणाही पवार यांनी केली. 

३) रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळा दरवर्षी राज्य सरकार साजरा करणार असून त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

टॅग्स :मुंबईमेट्रोठाणेअजित पवार