लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :मुंबई महापालिका क्षेत्रातील नगर पथविक्रेत्यांची (फेरीवाला) एक शिखर समिती आणि सात परिमंडळाच्या प्रत्येकी एक याप्रमाणे (सात समित्या) एकूण आठ समित्यांच्या निवडणुकीसाठी गुरुवारी शांततेत आणि सुरळीतपणे मतदान पार पडले. सरासरी ४९.४६ टक्के मतदान झाले.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार, मतदान प्रक्रिया राबवून मतमोजणी आणि निकाल राखून ठेवले आहेत. सर्व मतपेट्या स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या असून, न्यायालयाचे आदेश प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली.
केंद्र शासनाच्या सूचनेनुसार महानगरपालिका कार्यक्षेत्रातील फेरीवाल्यांची शिखर समिती आणि सात परिमंडळांच्या सात अशा एकूण आठ समित्यांसाठी ५ ते २९ ऑगस्ट २०२४ या कालावधी दरम्यान निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. एकूण आठ समित्यांच्या सदस्यपदासाठी २३७ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये १९० पुरुष, तर ४७ महिला उमेदवार होते.
१० जागांवर एकही उमेदवार नाही-
शिखर समितीसह सातही परिमंडळांच्या मिळून एकूण ६४ जागांपैकी १० जागांवर एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही, तर १७ जागांसाठी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज आल्यामुळे या १७ उमेदवारांची बिनविरोध निवड करण्यात आली. उर्वरित ३७ जागांसाठी विविध विभाग स्तरावरील (वॉर्ड) एकूण ६७ मतदान केंद्रांवर मतदान पार पडले.