Join us  

विनापरवानगी झाड तोडल्यास ५० हजारांचा दंड; झाडे जगविण्यासाठी खर्चाची उड्डाणे कोटींमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 10:30 AM

मुंबई शहरामधील झाडांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याची ओरड करीत पर्यावरणप्रेमींकडून याबाबत आवाज उठविला जातो.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई शहरामधील झाडांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याची ओरड करीत पर्यावरणप्रेमींकडून याबाबत आवाज उठविला जातो. आता शहरी भागात एखादे झाड अनधिकृतपणे तोडल्यास ५० हजार रुपये दंडाची आकारणी करण्यात येणार आहे. महापालिकेकडून लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

शहरात झाडांची संख्या वाढावी, म्हणून महापालिका प्रशासनाकडून पावले उचलण्यात येत आहेत. दरवर्षी शेकडो झाडांची लागवड केली जाते. लावलेली झाडे टिकावीत यासाठी झाडे लावणे, जोपासणे, अनधिकृत झाडांची कत्तल रोखण्याची जबाबदारी सरकारने महापालिकेकडे सोपविली आहे. एखादे धोकादायक झाड तोडायचे असेल तर पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची परवानगी घेणे आवश्यक आहे. विनापरवाना झाड तोडले तर आता ५० हजारांपर्यंत दंडाची आकारणी होऊ शकते.

आधी पाच ते दहा हजार दंड-

पालिकेकडून आतापर्यंत एखादे झाड तोडल्याची तक्रार प्राप्त झाल्यास पाच ते दहा हजारांपर्यंत दंडाची आकारणी करण्यात येत होती.

इमारत, रस्त्यासाठी कुऱ्हाड-

सरकारचा उपक्रम असला तरी झाड तोडण्यासाठी परवानगी घ्यावीच लागते. इमारत बांधणे, रस्ता रुंदीकरणात बाधित झाडे तोडण्यासाठी परवानगी लागते. 

झाड तोडण्यास परवानगी कुठे घ्याल ?

धोकादायक झाड तोडायचे असेल तर पालिकेच्या मुख्य उद्यान अधीक्षकांकडे अर्ज करावा लागतो. हा अर्ज वृक्ष प्राधिकरण समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येतो.

आतापर्यंत दंडाची आकारणी झाल्याची माहिती पालिकेकडे उपलब्ध नाही. याउलट सरकारी कामांसाठी मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जात आहेत. एमएमआरसीएलने गेल्या आर्थिक वर्षात ५८४ झाडे लावल्याची माहिती दिली आहे. या झाडांच्या देखभालीसाठी १२ कोटी खर्च होणार असल्याचा दावा पालिकेकडून करण्यात आला आहे. मात्र, २०२२-२३ मध्ये लावलेल्या झाडांमधील २० टक्के झाडे जंगली नसल्याची माहिती माहितीच्या अधिकारात समोर आली आहे. - गॉडफे पिमेंटा, वॉचडॉग फाउंडेशन

टॅग्स :मुंबई महानगरपालिकापर्यावरण