Join us  

'आश्रय' मधून कर्मचाऱ्यांना ५४ घरे; कुलाब्यातील दोन इमारतींचा पुनर्विकास विस्तार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 11:13 AM

सफाई कामगारांना हक्काची घरे देण्याचा प्रश्न रखडला आहे.

मुंबई : आश्रय योजनेंतर्गत मुंबई महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी दक्षिण मुंबईतील कोचीन स्ट्रीट येथील पुनर्विकास झालेल्या दोन इमारतींचा विस्तार केला जाणार आहे. या इमारतींच्या बाजूच्या प्लॉटवर कामगारांसाठी ५४ घरे बांधली जाणार आहेत. पालिकेने त्यासाठी निविदा मागवल्या आहेत.

सफाई कामगारांना हक्काची घरे देण्याचा प्रश्न रखडला आहे. आश्रय योजनेंतर्गत मुंबईत काही ठिकाणी पहिल्या टप्प्यात सुमारे १२ हजार घरे बांधली जाणार आहेत. सीएसएमटी येथील फोर्ट भागातील कोचीन स्ट्रीटवरील पालिका वसाहतीच्यापुनर्विकासात आतापर्यंत ८६ कामगारांना घरे मिळाली आहेत. सीएस क्रमांक १९९७ च्या प्लॉटवर दोन पुनर्विकास इमारती बांधण्यात आल्या आहेत. या इमारतींच्या बाजूच्या एमबीपीटी प्लॉटवर विस्तारित इमारती बांधण्याचे प्रस्तावित होते. यात ५४ घरे बांधली जातील. आश्रय योजनेअंतर्गत घरे देण्यासाठी या इमारतींचा विस्तार केला जाणार आहे. या योजनेअंतर्गत कामगारांना देण्यात येणारे घर २३८ चौरस फुटांचे आहे.  

सफाई कामगारांच्या घराचा प्रश्न टप्प्याटप्प्याने मार्गी-

१) मुंबई पालिकेत सुमारे २८ हजार सफाई कामगार कार्यरत आहेत. परंतु या कामगारांसाठी पालिका वसाहतींमध्ये अवघ्या सहा हजार सेवा सदनिका आहेत.

२) सेवेत असलेले बहुतांशी सफाई कामगार झोपडपट्टीत राहतात. त्यांना मालकी हक्काची घरे देण्याची मागणी केली जात होती. आयोगानेही त्यांना घर देण्याची शिफारस केली होती. ती राज्य सरकार आणि पालिकेने मान्य केल्याने घरांचा प्रश्न टप्प्याटप्प्याने मार्गी लावला जात आहे.

आतापर्यंत ८६ कामगारांना घरे-

फोर्टमधील कोचीन स्ट्रीटवरील पालिका वसाहतीच्या पुनर्विकासात आतापर्यंत ८६ कामगारांना घरे मिळाली आहेत. आता पुनर्विकासाच्या दोन इमारतींचा नियोजित विस्तार केला जाणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या ५४ घरांचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे.

टॅग्स :मुंबईनगर पालिकाराज्य सरकार