Join us

निर्माल्यापासून ५५० टन सेंद्रिय खत बनविणार; पालिकेची चौपाट्यांवर स्वच्छता मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 10:42 AM

मुंबईकरांनी लाडक्या बाप्पाला निरोप दिल्यानंतर पालिकेने लागलीच विविध चौपाट्या, समुद्रकिनारी विशेष स्वच्छता मोहीम राबवत ३६३ मेट्रिक टन घनकचरा संकलित केला.  

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईकरांनी लाडक्या बाप्पाला निरोप दिल्यानंतर पालिकेने लागलीच विविध चौपाट्या, समुद्रकिनारी विशेष स्वच्छता मोहीम राबवत ३६३ मेट्रिक टन घनकचरा संकलित केला.  यंदाच्या गणेशोत्सवात नैसर्गिक आणि कृत्रिम तलाव, अशी सर्व विसर्जनस्थळे मिळून सुमारे ५५० मेट्रिक टन निर्माल्य संकलित करण्यात आले असून, त्यापासून सेंद्रिय खत तयार करण्याची प्रक्रिया पालिकेने सुरू केली आहे.

पालिकेने विसर्जनासाठी भाविकांना विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देतानाच १५ हजार कर्मचारी तैनात केले होते. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला चालना देण्यासाठी यंदा मूर्ती विसर्जनासाठी ६९ नैसर्गिक स्थळांसह २०४ कृत्रिम कुंडांची व्यवस्था केली होती. निर्माल्य संकलनासाठी ५०० हून अधिक निर्माल्य कलश आणि ३५० वाहने सज्ज ठेवली होती. 

अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन झाल्यानंतर पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने मंगळवारी आणि बुधवारी स्वराज्यभूमी (गिरगाव), दादर, चिंबई, जुहू, वेसावे (वर्सोवा), मढ, गोराई समुद्रचौपाटी, आदी ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली.

आयुक्तांकडून पाहणी-

पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी बुधवारी विविध चौपाट्यांची पाहणी करत स्वच्छतेविषयी आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी त्यांनी पालिकेचे स्वच्छता कर्मचारी, विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, विद्यार्थी यांच्याशी संवाद साधला. 

स्वच्छता मोहिमेत चौपाट्यांवर पडलेले खाद्यपदार्थांचे वेष्टण, पाण्याच्या बाटल्या, पिशव्या, पादत्राणे आदी वस्तूही संकलित करण्यात आल्या. या वस्तूंची योग्य रीतीने विल्हेवाट लावण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.

उद्यानांमध्ये वापरणार खत-

यंदा गणेशोत्सवात संकलित केलेले ५५० टन निर्माल्य खतनिर्मितीसाठी पालिकेच्या २४ विभागांमधील विविध ३७ सेंद्रिय खतनिर्मिती प्रकल्पांमध्ये नेण्यात आले. एका महिन्यात या निर्माल्याचे रूपांतर सेंद्रिय खतामध्ये होईल. हे खत महापालिकेच्या उद्यानांमध्ये वापरासाठी देण्यात येणार आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकागणेशोत्सव 2024