लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ)ने एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांत २८३ मुजोर आणि बेशिस्त टॅक्सी चालकांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून आठ लाख ९७ हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.
टॅक्सी चालक सोईचे भाडे नसल्यास प्रवाशांना सर्रास नकार देतात. अशा मुजोर टॅक्सी चालकांना शिस्त लावण्यासाठी परिवहन विभागाने भरारी पथकांची नेमणूक केली आहे. या पथकामध्ये एक अधिकारी आणि एक शिपाई यांचा समावेश आहे. आरटीओच्या मदत क्रमांकावर येणाऱ्या तक्रारींच्या आधारे टॅक्सी चालकांवर कारवाई केली जाते. जवळचे भाडे नाकारणे, जादा भाडे आकारणे, महिलांसह इतर प्रवाशांशी उद्धटपणे वागणे, प्रवाशांच्या विसरलेल्या वस्तू परत न करणे अशा प्रकारच्या तक्रारींनुसार कारवाई केली जाते.
आणखी भरारी पथके-
मुंबईत अंदाजे ३० ते ३५ हजार टॅक्सी आहेत. त्यामुळे भरारी पथकांची संख्या वाढविल्यास मुजोर टॅक्सी चालकांवर वचक ठेवून त्यांना शिस्त लावणे अधिक सोयीचे होईल. परिवहन विभाग आणखी काही भरारी पथके नेमण्याबाबत सकारात्मक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सध्या मुंबई, ठाणे, पनवेल विभागांत भरारी पथके कार्यरत आहेत. त्यांची संख्या वाढवली जाऊ शकते. प्रवाशांची तक्रार आल्यानंतर त्वरित कारवाई करण्यात येते. - वरिष्ठ परिवहन अधिकारी, परिवहन विभाग