लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : डी. एन. नगर ते मंडाळे ‘मेट्रो २ बी’ मार्गिकेच्या कामाने गती पकडली आहे. आता या मेट्रो मार्गिकेची स्थापत्य कामे ७२ टक्के कामे पूर्णत्वास गेली आहेत. तर कारशेडचे कामही अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे ही मेट्रो मार्गिका लवकरच सुरू होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
डी. एन. नगर ते मंडाळे ‘मेट्रो २ बी’ मार्गिका २३.६ किलोमीटर लांबीची असून २० स्थानके आहेत. या मार्गिकेसाठी सुमारे १०,९८६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ‘एमएमआरडीए’च्या यापूर्वीच्या नियोजनानुसार ‘मेट्रो २ बी’चे काम ऑक्टोबर २०२२ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते; मात्र कामाची अपेक्षित गती न गाठल्याने तीन पॅकेजमधील कंत्राटदार बदलण्याची वेळ एमएमआरडीएवर आली होती.
यातील दोन पॅकेजमधील कंत्राटदारांची २०२१ मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. तर या प्रकल्पातील बीकेसी एमटीएनएल ते चेंबूर डायमंड गार्डन या पॅकेज १०२ मध्ये तब्बल दोन वर्षांनी म्हणजेच मार्च २०२२ मध्ये कंत्राटदाराची नियुक्ती केली होती.
त्यावेळी या प्रकल्पाचे केवळ २.३५ टक्के काम पूर्ण झाले होते. त्यातून या प्रकल्पाच्या कामाला विलंब झाला होता.
१) ‘मेट्रो २ बी’ मार्गाची लांबी-२३.६ किमी
२) प्रकल्पाचा खर्च- १०,९८६ काेटी
३) प्रकल्पाची स्थापत्य कामे- ७२ टक्के पूर्ण
४) प्रकल्प पूर्णत्वाची अपेक्षित तारीख- जून २०२५
कारशेडसाठी ३१.४ हेक्टर जागा-
मात्र, आता या प्रकल्पाच्या कामाने गती पकडली आहे. सद्य:स्थितीत प्रकल्पाची स्थापत्य कामे ७२.१६ टक्के काम पूर्ण झाली आहेत. तर मंडाळे येथे या मेट्रो मार्गिकेच्या कारशेडची उभारणी केली जात आहे. हे कारशेड सुमारे ३१.४ हेक्टर जागेवर उभारले जाणार आहे. त्याचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. तर मंडाळे ते चेंबूर या भागातील मार्गाच्या ट्रॅकची आणि आर्किस्ट्रक्चरल फिनिशिंगची कामे सुरू आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.