Join us  

रस्ते काँक्रिटीकरणाला येणार वेग; १ ऑक्टोबर ते ३१ मेदरम्यान कामे पूर्ण करण्याचे पालिकेचे नियोजन 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2024 10:15 AM

पालिकेकडून ऑक्टोबरपासून मुंबईतील विविध रस्त्यांची कामे हाती घेतली जाणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पालिकेकडून ऑक्टोबरपासून मुंबईतील विविध रस्त्यांची कामे हाती घेतली जाणार आहेत. १ ऑक्टोबर ते ३१ मे २०२५ या २४० दिवसांत रस्ते काँक्रिटीकरणाची कामे वेगाने पूर्ण करा, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. 

मात्र, रस्त्यांचा दर्जा, गुणवत्ता यामध्ये तडजोड खपवून घेतली जाणार नाही. कामे सुरू करण्यापूर्वी रस्ते विकासाचा प्राधान्यक्रम अधिकाऱ्यांनी निश्चित करावा, उपयोगिता सेवावाहिन्या संबंधित यंत्रणांशी समन्वय ठेवावा. शिवाय ३१ मे २०२५ पर्यंत काँक्रिटीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण करण्याचे नियोजन करावे, अशा सूचना बांगर यांनी केल्या आहेत.

‘कामाचे वेळापत्रक तयार करा’-

पहिल्या टप्प्यात मुंबई पालिकेच्या हद्दीतील ३९२ किलोमीटर, तर दुसऱ्या टप्प्यात ३०९ किलोमीटर, असे एकूण ७०१ किलोमीटर रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी कार्यादेश दिले आहेत. यासंदर्भात बांगर यांनी आढावा बैठक घेतली.

काँक्रिटीकरणासाठी रस्ता खणण्यापासून ते काम पूर्ण होऊन रस्ते वाहतूक सुरू होईपर्यंत साधारणतः ३०-४५ दिवस लागतात. त्यामुळे अभियंत्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील रस्त्यांची यादी तयार करावी. त्यानुसार वेळेत काम करावे, असे बांगर म्हणाले.

मगच नवीन कामे घ्या!

१) अपूर्ण अवस्थेतील रस्ते पूर्ण करूनच मगच नवीन काम काम हाती घ्यावे.

२) कंत्राटदारांनीही एकावेळी अधिक ठिकाणी कामे हाती घेऊन ती वेगाने पूर्णत्वास न्यावीत. 

३) या शिवाय वाहतूक पोलिसांकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घेण्यासाठी पालिका समन्वय राखेल, असेही बांगर म्हणाले.

‘पुन्हा खोदकाम नको’-

पालिकेतील जलअभियंता, पर्जन्य जलवाहिन्या, पाणीपुरवठा प्रकल्प, मलनिस्सारण प्रचालन, मलनिस्सारण प्रकल्प आदी विविध विभाग तसेच वीज, गॅस वितरण आणि दूरध्वनी कंपन्यांशी समन्वय ठेवून सेवा वाहिन्यांची कामे करावीत. त्यामुळे पुन्हा रस्ते खोदावे लागणार नाही. 

आयआयटीची नजर-

काँक्रिटीकरण कामाचा दर्जा, गुणवत्ता चांगली राहावी, यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) यांची त्रयस्थ संस्था म्हणून केली जाणार आहे. याबाबत लवकरच करार होणार आहे. काँक्रिटच्या प्लॅन्टपासून ते काँक्रिट रस्त्यावर क्युरिंगपर्यंतच्या कामाचा दर्जा आयआयटी तपासेल, असे अतिरिक्त आयुक्त बांगर म्हणाले.

टॅग्स :मुंबईनगर पालिकारस्ते वाहतूक