लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईच्या लोकल प्रश्नी रेल्वे प्रवासी संघटनांनी २२ ऑगस्ट रोजी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. याबाबत आता रेल्वे प्रशासन संघटनांशी बोलण्यास तयार झाले आहे. मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयातून प्रवासी संघटनांना १४ ऑगस्ट रोजी चर्चेसाठी आमंत्रण देण्यात आले असली तरी पाचपैकी एक मागणी मान्य करा तरच बैठकीला येऊ, असे संघटनांनी रेल्वेला कळविले आहे. मात्र, संघटनांना काहीच उत्तर मिळाले नसल्याने सफेद कपडे आंदोलन करण्यावर संघटना ठाम आहेत.
गेल्या काही महिन्यांत मुंबई उपनगरीय लोकल प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. गेल्या तीन महिन्यांत ३०० हून अधिक वेळा सिग्नल बिघडल्याने सेवा विस्कळीत झाली. त्याचप्रमाणे इतर कारणांनी सुद्धा सेवा अनेक वेळा विस्कळीत झाली आहे. त्यामध्ये लांब पल्ल्याच्या गाड्या चालवण्यासाठी अनेक वेळा पीक अवरमध्ये सुद्धा लोकल रेल्वे थांबवल्या गेल्या आहेत. लोकल सेवा आठवड्यात अनेक वेळा उशिराने धावत असते. २०२३ मध्ये २५९० आणि २०२४ मध्ये आजपर्यंत ट्रॅकवर १४१६ मृत्यूची नोंद झाली आहे, असे मुंबई रेल प्रवासी संघाचे अध्यक्ष मधू कोटियन यांनी सांगितले.
...अशा आहेत पाच प्रमुख मागण्या-
१) गर्दीच्या वेळी मेल आणि एक्स्प्रेसऐवजी लोकल रेल्वेला प्राधान्य द्यावे.
२) लोकलसाठी बांधण्यात आलेले ट्रॅकवर फक्त लोकल चालवण्यात याव्यात, मेल एक्स्प्रेस तत्काळ थांबवण्यात याव्यात.
३) वर्षोनुवर्षे रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यात यावेत.
४) यांत्रिक बिघाड, तांत्रिक कारण, मालगाडी, मेल, लोकल रूळावरून घसरल्याने किंवा इतर कारणाने लोकल सेवा रखडली तर आपत्कालीन परिस्थिती जाहीर करावी.
५) संपूर्ण मुंबई लोकल सेवेसाठी मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, हार्बर, ट्रान्स हार्बर, एम आर व्ही सी मिळून वेगळे संयुक्त प्राधिकरण करण्यात यावे.